बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण कला व शिक्षण विकास संस्था सामाजिक बदल घडवण्यासाठी कार्यरत असून महिला सक्षमीकरण, गरजू व सनाथ मुलांचा सर्वांगीण विकास, आरोग्य, शिक्षण, खेडेगावांचा विकास, समुदाय विकास अशा अनेक विषयावर गेली ११ वर्षे सातत्याने कार्यरत असून देशातील ४ राज्यांमध्ये संस्थेच्या कामांचा विस्तार झाला आहे.
गेली अनेक वर्षे केलेल्या कामातून संस्थेचे समाजसाठीचे समर्पण लक्षात घेऊन संस्थेच्या कार्याबद्दल संस्थेला ‘सीएसआर वर्ल्ड डे’ या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या समूहाकडून कम्युनिटी डेव्हलपमेंट राष्ट्रीय पुरस्कार काल १५ सप्टेंबरला बेंगलोर येथील ताज या पंचतारांकित हॉटेलमध्ये मान्यवरांच्या हस्ते वितरण झाला.
गेली १० वर्षे सीएसआर वर्ल्ड डे हा समूह सामाजिक क्षेत्रातील प्रेरणादायी काम करणारे मान्यवर आणि संस्था याना पुरस्कृत करते. १० व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात कोकण कला व शिक्षण विकास संस्थेला पुरस्कार प्रदान झाला असून ही गेल्या अनेक वर्षे संस्थेने केलेल्या कामाची पोचपावती असल्याची भावना अध्यक्ष दयानंद कुबल यांनी बोलून दाखवली.