खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर यांनी बिबट्याच्या वावराची वनविभागाकडे केली तत्काळ दखल घ्यायची मागणी.
खारेपाटण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण मध्ये व
खारेपाटण सह आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. आज सायंकाळी ५:३० च्या सुमारास बिबट्याने एका बकऱ्या वर हल्ला करत त्याचा बळी घेतल्याची घटना खारेपाटण टाकेवाडी येथे घडली. हा बकरा टाकेवाडी येथे राहणाऱ्या सौ. शशिकला सावंत यांच्या मालकीचा असून बकरा हा रानात चरत असताना बिबट्याने येऊन त्यावर हल्ला केला ,त्या बकऱ्याच्या सोबत असणाऱ्या राखण्यासमोर ही घटना घडली असे सांगण्यात येत आहे. ही घटना ही लोकवस्ती पासून सुमारे २०० ते ३०० मीटर अंतरावर घडली असून नगरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटना घडल्या नंतर तात्काळ वनविभागाला कळविण्यात आले. तसेच खारेपाटण पोलीस पाटील दिगंबर भालेकर यांना कळविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच खारेपाटण सरपंच यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
यावेळी घटनास्थळी श्री.सावंत, पशुवैद्यकीय अधिकारी भुते, पशुवैद्यकीयचे श्री जाधव , ग्रामपंचायत सदस्य दक्षता सुतार आदी उपस्थित होते. सदर घटनेचा वनविभागाकडून पंचनामा करून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.