बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील डाॅ. दुर्भाटकर यांच्या ‘वन रुपी क्लिनिक’ सेवेचा नागरीक मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. अस्थिरोग तज्ञ डॉ निखिल अवधूत, मेंदु विकार चिकित्सक डॉ. मुकुंद अंबापूरकर, नेत्ररोग तज्ञ डॉ. संजय जोशी या डॉक्टरांच्या सामाजिक सेवेला पसंती व सावंतवाडीचे सेवाभावी स्त्रीरोग तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्या संकल्पनेतून आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या पुढाकारातून ‘वन रुपी क्लिनिक’चा दुर्वांकुर बिल्डिंग, जुना शिरोडा नाका, सावंतवाडी येथे गेल्या महिन्यात शुभारंभ करण्यात आला होता.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त म्हणजे फक्त एक रुपयात आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्ह्यातील तसेच मुंबईतील अनेक डॉक्टर या क्लिनिकमध्ये आरोग्य सेवा पुरवण्याच्या भावनेतून काम करत आहेत त्यामध्ये डॉ. विवेक पाटणकर (मधुमेह तज्ञ) कुडाळ, डॉ. प्रवीण देसाई( बालरोग तज्ञ), डॉ. कौतुभ लेले (माणसोपचार तज्ञ), डॉ. बी. येस. महाडेश्वर ( मधुमेह तज्ञ) कणकवली, डॉ निलेश पेंडुरकर (होमियोपॅथी तज्ञ), डॉ. संजना देसकर (त्वचा रोग तज्ञ), डॉ . गुरुप्रसाद सौदत्ती (जनरल तपासणी) कुडाळ, डॉ. शुभम बिरजे (जनरल तपासणी), डॉ. राजेंद्र गावस्कर (जनरल तपासणी) वेंगुर्ला, डॉ. गौरी तानावडे (जनरल तपासणी) हे डॉक्टर उपलब्ध असून आठवड्यातील सातही दिवस हे क्लिनिक उघडे असणार आहे अशी माहिती दयानंद कुबल यांनी दिली.
सामान्य जनताच नव्हे तर सामान्य जनतेला एक रुपयात सुविधा उपलब्ध करून देण्यास अनेक डॉक्टर पुढे सरसावले असून हे डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्या संकल्पनेचे आणि सामाजिक कार्याचे यश आहे. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या कामाची भेट देऊन दखल घेतली असून सिंधुदुर्गातील खेडोपाड्यातील जनतेच्या आरोग्यासाठी असे क्लिनिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी चालू करण्यासाठी पुढाकार घेण्याचे ठरवले आहे. या एक रुपयात मिळणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त आणि उच्च दर्जाच्या आरोग्य सेवेचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी केले आहे.