बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या रोणापाल पूर्णीचा ओहोळ येथे काल दुपारी रोणापाल येथील शेतकरी प्रकाश गावडे म्हशींना चरायला घेऊन गेले होते. त्यानंतर पाणी पिण्यासाठी गेलेल्या म्हैशींवर ओहोळात दबा धरून बसलेल्या मगरीने हल्ला केला. यामध्ये ‘मुरा’ जातीच्या गाभण म्हैशीचा जबडा फाडल्याने जबर म्हैस जखमी झाली तर अन्य जनावरांनी आपला जीव वाचवला. जखमी म्हैशीवर उपचार करण्यात आले.
यानंतर मात्र ‘म्हशी पाण्यात देऊ नका’ असे उत्तर वजा अजब सल्ला वनविभाग अधिकाऱ्यांनी दिल्याने शेतकरी आश्चर्यचकित झाले. पाण्याशिवाय म्हशी कशा राहू शकतील असा सवाल उपस्थित शेतकऱ्यांनी करत वनाधिकाऱ्यांना धारेवर धरले. वन अधिकाऱ्यांनी म्हैशीना पाण्यात नेऊ नका असे सांगितल्यावर शेतकरी मंगेश गावडे, सुरेश गावडे, अशोक कुबल, बाबल तुयेकर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
तिथल्या मगरींचा त्यांचा असा अधिवास विकसीत करून मानवी वस्ती व पाळीव पशूंचे संरक्षण ही सुद्धा यंत्रणांची जबाबदारी आहे की नाही अशी प्रतिक्रिया सध्या परिसरात व्यक्त होत आहे.