बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या माणगांव येथे नेहरू युवा केंद्र, सिंधुदुर्ग (युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय, भारत सरकार) व कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयच्या क्रीडांगणावर संपन्न झालेल्या या स्पर्धेला तालुक्यातील महाविद्यालये आणि शाळांमधील विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला.
स्पर्धेची सुरुवात जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती विद्या शिरस, श्री एकनाथ केसरकर (सचिव- माणगाव पं.शि.प्र मंडळ ), उपमुख्याध्यापक संजय पिळनकर, प्रशालेचे शिक्षक श्री कमलाकर धुरी, श्री चंद्रकांत चव्हाण, नेहरू युवा केंद्राचे विल्सन फर्नांडिस व कोकण एनजीओचे प्रकल्प व्यवस्थापक श्री अजिंक्य शिंदे या मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून झाली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि मुलांमधील खेळाचे महत्व वाढावे या दृष्टिकोनातून आयोजित स्पर्धेमध्ये १०० मीटर धावणे हा खेळ प्रकार घेण्यात आला आला. सर्वच खेळात या क्रीडांगणावर विद्यार्थ्यांनी मैदान गाजवत चुणूक दाखवली. स्पर्धेत प्रथम, द्वितीय, आणि तृतीय क्रमांकाच्या विजयी खेळाडूंना भारत सरकारच्या खेलमंत्रालयाचे प्रमाणपत्र व पदक देऊन मान्यवरांच्या हस्ते सम्मानित करण्यात आले. या स्पर्धेत प्रथमेश सावंत आणि कृष्णा सावंत यांनी पंचाची भूमिका पार पाडली.
प्रास्ताविक समीर शिर्के यांनी केले तर अवंती गवस यांनी स्पर्धेतील सर्व सहभागी कॉलेज, विद्यार्थी आणि पालक वर्ग यांचे आभार मानले. क्रीडा महोत्सव यशस्वी होण्यासाठी कोकण संस्थेचे प्रदीप पवार, बाळकृष्ण शेळके, प्रशालेचे प्रशिक्षक भरत केसरकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेच्या स्वयंसेवकांनी आणि दापोली कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी हातभार लावला.