माजी खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते झाले प्रकाशन
कणकवली | उमेश परब : “सकला ही केवळ एक व्यक्ती नाही तर ती संपूर्ण भारतीय संस्कृतीची, वांडमयाची, साहित्याची, नाट्यकृतीची, कादंबरीची नायिका आहे. सकला ही एक वैश्विक संकल्पना आहे. ती एक जबाबदारी आहे. ती नुसती प्रेमिका नाहीय.. तिच्यातील स्वाभिमान जागा करणं, तिच्यातील स्वतंत्र व्यक्तित्व मान्य करणं, तिला सन्मानाने वागवणं हा सकल्याचा अर्थ आहे “, अशी भावना माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी कवी डॉ. सतीश पवार यांच्या ” सकला ” या मालवणी काव्यसंग्रहांच्या प्रकाशनप्रसंगी व्यक्त केली. कवी डॉ. सतीश पवार लिखित सकला या मालवणी काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा एका माध्यमाच्या कार्यालयात माजी खा. डॉ मुणगेकर यांच्या हस्ते संपन्न झाला . प्रकाशन प्रसंगी वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर, कवी सतीश पवार, कवयित्री सरिता पवार, अंजली मुतालिक, प्रा. अमर पवार हे उपस्थित होते. डॉ. मिलिंद कुलकर्णी ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी बोलताना वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर म्हणाले की डॉ.सतीश पवार यांची सकला ही प्रत्येकाच्या आयुष्यात कधी न कधी येऊन गेलेली असतेच. प्रत्येकाच्या काळजाचा नाजूक कोपरा ही सकला नकळत स्पर्शून गेलेली असते. मालवणी ग्रामीण मुलूखातील 25 ते 30 वर्षांपूर्वीचा काळ कवी डॉ सतीश पवार यांनी अत्यंत हलक्याफुलक्या शब्दांत रेखाटला आहे. वरवर जरी या प्रेमकविता वाटत असल्या तरी या काव्यसंग्रहातील आजी काजी भाजता सारख्य कविता वाचल्यानंतर आजीने चुलीत भाजून फोडून दिलेलं गरमागरम काजुगर आठवून डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत अशी भावना व्यक्त केली. डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी सकल्याचे विविध पैलू, आणि सकल्याला बिलगलेला मालवणी मातीचा गंध चपखल शब्दांत रसिक वाचकांसाठी दरवळत ठेवल्याचे सांगितले. कवी डॉ. सतीश पवार यांनी सकला काव्यसंग्रह निर्मितीविषयी बोलताना जेष्ठ पत्रकार विजय शेट्टी यांच्याकडून मालवणी कविता लिहिण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. याप्रसंगी कवयित्री अंजली मुतालिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कवयित्री सरिता पवार यांनी केले.