मालवण | नझ़िरा शेख़ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूलच्या २०२३ सालच्या पावसाळी क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. ‘आरोग्यम् धनसंपदा’ अर्थात ‘हेल्थ इज वेल्थ’ या संकल्पनेवर, शनिवारी २६ ऑगस्टला संपन्न झालेल्या या स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मालवण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. क्रीडा ज्योत हाती घेवून सर्व हाऊस कॅप्टननी मोलाचा संदेश दिला. पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी शालेय क्रीडास्पर्धांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील स्थान व त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम याविषयी आपले विचार व्यक्त केले.
उद्घाटनाच्या सामन्यात पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी स्वतः व्हॉलीबॉल खेळत खेळाचा आनंद लुटला. तसेच पालक प्रतिनिधींसाठी आयोजित केलेल्या खेळामध्येही पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. क्रीडास्पर्धेसाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचा सहभाग मौलिक होता. प्रशालेचे मुख्याध्यापक फा. ऑल्वीन गोन्साल्वीस यांच्या हस्ते या वर्षीच्या मान्सून स्पोर्ट्स २०२३ चे विजेता चॅम्पियन ग्रीन हाऊस व लिटिल चॅम्प यल्लो हाऊस यांना विजेतेपदाचे चषक देण्यात आले. दोन दिवस चाललेला हा कार्यक्रम सुरळीत पणे पार पडल्यामुळे प्रशालेचे मुख्याध्यापक यांनी समाधान व्यक्त केले व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे सर्व सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ. फिलोमिना पंडित व आभार सौ. थेल्मा फर्नांडिस यांनी केले. अतिशय शिस्तबद्ध व उत्साहाने संपन्न झालेल्या या स्पर्धेबद्दल रोझरी इंग्लिश स्कूलची विशेष प्रशंसा होत आहे.