८० विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहे आर्थिक भुर्दंड..!
नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘कुंभवडे ते करूळ आणि वैभववाडी ते करूळ’ अशा एसटी फेऱ्या तात्काळ सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी करूळचे सरपंच नरेंद्र कोलते यांनी कणकवली एसटी आगार व्यवस्थापकांकडे केली आहे. याबाबत त्यांनी वैभववाडी वाहतूक नियंत्रक भागोजी गुरखे यांना निवेदन दिले आहे. यात जवळपासच्या ८० विद्यार्थ्यांना एसटी नियमित नसल्यामुळे फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे तात्काळ एसटी सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, गावातील जवळपास ८० विद्यार्थी सांगुळवाडी व वैभववाडी येथे माध्यमिक, उच्च माध्यमिक, आयटीआय, कृषी कॉलेज, डी. फार्मसी, बी. फार्मसी चे शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना एसटीची सोय नसल्याने अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.तसेच करुळ माध्यमिक विद्यालयात कुंभवडे गावचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एसटी ची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान टाळावे यासाठी एसटी सेवा सुरू करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी सिद्धेश कोलते, विद्यार्थी रोहित चव्हाण व विद्यार्थी उपस्थित होते.