भाजपच्या बाळा गोसावींनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यावर सुरु केलेली टीकेची मालिका आता नवनाथ झोरे विरुद्ध सुशील खरात अशा टप्प्यावर.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व भाजप यांच्यातील शाब्दिक चकमकीच्या मालिकेत आज सकाळी भाजप भटके विमुक्त आघाडीचे तालुका उपाध्यक्ष सुशील खरात यांनी देवली ग्रामपंचायतीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य नवनाथ झोरे यांना त्यांच्या कामाबद्दलचे पुरावे द्यायचे आवाहन केले होते. नवनाथ झोरे यांना मालवण तालुक्यात कोणी ओळखत नाही व त्यांना तालुक्यातल्या धनगर वस्त्यांची संख्याही माहीत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य नवनाथ झोरे यांनी त्यांच्या कामाबद्दलचे पुरावे व फोटो सादर केले आहेत.
वेरळ येथे निवेदन देताना नवनाथ झोरे व इतर ( संग्राहित फोटो)
१६ ऑक्टोबर २०२० ला धनगर समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नावर मालवण तहसीलदार यांना समस्त धनगर समाजाच्या वतीने तत्कालीन तालुकाध्यक्ष या जबाबदारीने स्वतः मालवण तहसीलदार यांना निवेदन दिले होते. त्यावेळी त्या निवेदनावर दीपक रामा खरात, सोमनाथ जनार्दन झोरे, गणेश जानू खरात, गणेश जानू झोरे, विठोबा धाकोजी खरात, विजय लक्ष्मण खरात अशा धनगर समाज बांधवांची हस्ताक्षरे आहेत. आरक्षण व विविध मागण्यांसाठी हे निवेदन गेले होते. मेंढपाळांवर सतत होणार्या अन्याय, एस. टी. आरक्षणाची मागणी, अंमलबजावणीची तरतूद असताना शासन दरबारी रखडलेले प्रश्न अशा विविध मागण्यांसाठी ते रितसर निवेदन दिले गेल्याचे नवनाथ झोरे यांनी स्पष्ट केले आहे व त्या दरम्यान कोणतीही पक्षीय भूमिका न घेता केवळ समस्त धनगर समाजाच्या हीतासाठीच व सर्व बांधवांचे विनम्रपणे प्रतिनिधित्व करत आपण ते निवेदन दिल्याचे नवनाथ झोरे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.
तसेच ऑल इंडिया धनगर समाज तालुकाध्यक्ष या नात्याने पूर्वी वेरळ धनगरवाडी येथील रस्ता, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गतची मंजूर होऊन अंमलबजावणी न झालेल्या कामांसाठी वेरळ ग्रामपंचायत व ग्रामसेवकांकडेही लेखी निवेदन व प्रत्यक्ष भेटीतून पाठपुरावा केला होता.
धनगर समाजाभिमुख व सर्वसामान्य लोकांसाठीही आपण खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांच्या व आपल्या शिवसैनिकांच्या माध्यमातून, अशा इतर कामांसाठी आपण नेहमीच तालुक्यात प्रत्यक्ष भेटी गाठी घेत असतो. सत्तेत नसूनही आमदार वैभव नाईक यांनी विविध कामांची पूर्तता केलेली आहेतच व काही लवकरच पूर्ण होतील अशी आपल्याला खात्री असल्याचे नवनाथ झोरे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे.
ग्रामपंचायत सदस्य नवनाथ झोरे यांनी ‘आपल्याला कोण ओळखतं’ या पेक्षा आपण गाजावाजा न करता किती परिणामकारक कामगिरी धनगर समाजासाठी व गावासाठी करु शकतो यावर भर देत असल्याचे सांगत राजकारणात समाजकारणावर भर देणे हीच आमदार वैभव नाईक व तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची कार्यपद्धती असल्याचे सांगितले आहे.
या संपूर्ण प्रसिद्धी पत्र संघर्षाची सुरवात जरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या वरील भाजपचे जिल्हा पदाधिकारी बाळा गोसावी यांच्या टीकेतून झाली असली तरी आता ही मालिका नवनाथ झोरे विरुद्ध सुशील खरात अशा टप्प्यावर आलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी यांवर कोणतीच प्रतिक्रिया दिली नसून किंवा भाष्य केले नसून, सुशील खरात यांच्या आवाहनाला केवळ ५ तासात नवनाथ झोरे यांनी फोटों सहीत काही निवेदनांचा पुरावा म्हणून दाखला देऊन आवाहन काहीसे परतवून लावले आहे.