दोडामार्ग | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होत रहाणार आहेत. शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजना व उपक्रमांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास करणे आवश्यक असून यासाठी सर्वांनी भरीव योगदान देण्याचे आवाहन देखील केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले.
कसई – दोडामार्ग नगरपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन, दोडामार्ग नगरपंचायत नूतन अग्निशमन यंत्रणा, तसेच सेल्फी पॉईंटचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री श्री. नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षण व मराठी भाषी मंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर आदी उपस्थित होते.
श्री. राणे म्हणाले, जिल्ह्यातील तरुणांचे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्ह्यात उद्योग येणे आवश्यक आहे. यासाठी मी वैयक्तिक प्रयत्न करत आहे. वैद्यकीय क्षेत्रात लागणाऱ्या उपकरणांची निर्मिती करणारे उद्योग जिल्ह्यात गुंतवणुकीस तयार आहेत. लवकरच ही प्रक्रीया पूर्ण होईल. या उद्योगांबरोबरच जिल्ह्यात हॉटेल्स, रुग्णालय, शाळा व कॉलेज हे देखील उभे राहतील आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या जीवनात बदल घडून आर्थिक सुबत्ता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘पीएम विश्वकर्मा योजना’ सुरु होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून १२ बलुतेदारांना लाभ होणार आहे. दोडामार्ग पासून सर्व सुविधा तासाभराच्या अंतरावर आहेत. येथील नागरिकांनी देखील या सुविधांचा उपयोग करुन स्वत:चे उत्पन्न वाढविण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण म्हणाले, जिल्ह्याच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावणारा आडाळी औद्योगिक क्षेत्रात उद्योग येण्यासाठी शासन सर्वंतोपरी प्रयत्न करीत आहे. काजूच्या बोडांवर प्रक्रीया करणारे उद्योग देखील जिल्ह्यात सुरु होणे आवश्यक आहे. पर्यटनाला चालना मिळण्यासाठी रस्त्यांचा विकास होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्ते शहरांशी जोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भाग समृध्द झाला आहे. कोकणांच्या सर्वांगिण विकासासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
शालेय शिक्षणमंत्री श्री. केसरकर म्हणाले की ३ कोटी रुपये खर्चून सर्व सुविधा युक्त दोडामार्ग नगरपंचायतीची इमारत उभी राहणार आहे. तसेच नाट्यगृहाची देखील येथील नागरिकांची मागणी आहे. यासाठी देखील निधी देण्यात आलेला आहे. तसेच क्रीडा संकुल आणि हॉस्पीटल देखील लवकरच उभारण्यात येणार असल्याचेही श्री. केसरकर म्हणाले.