१६ दिव्यांगांची केली आरोग्य तपासणी ; वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित.
नवलराज काळे | सहसंपादक : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर करुळमधील २१ पैकी १६ दिव्यांगांच्या घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात आली. करुळ ग्रामपंचायतच्या वतीने ‘सरपंच दिव्यांगांच्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात आला. शासनाकडून दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची सरपंच नरेंद्र कोलते यांनी दिव्यांग बांधव व त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली.
वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एम. महेंद्रकर यांनी दिव्यांग बांधवांच्या घरोघरी जाऊन त्यांची आरोग्य तपासणी केली. दिव्यांग (अपंग) बांधवांसाठी आवश्यक ती औषधे उपलब्ध करून दिली. यावेळी आरोग्य सेवक एस. एस. लोखंडे, सामुदाय आरोग्य अधिकारी ए. एम. चोचे, आरोग्य सेविका एस. एस. चाफे, ग्रा.पं. सदस्य विलास गुरव, रेखा सरफरे, माधवी राऊत, ग्रामसेवक शशिकांत गुरव, जगदिश पांचाळ, जान्हवी पांचाळ, प्रकाश सावंत, उदय कदम व ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमाचे दिव्यांग बांधव व नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.
शासनाच्या विविध योजना दिव्यांग बांधवांना मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार तसेच सर्दी, ताप व साथीच्या आजाराकडे दुर्लक्ष न करता दिव्यांग बांधव व नातेवाईकांनी तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. असे आवाहन यावेळी सरपंच नरेंद्र कोलते यांनी केले. सरपंच श्री. कोलते यांच्या या उपक्रमाची प्रशंसा होत आहे.