अंबडचे श्रीहरी महाराज रसाळ भाविकांना करणार समुपदेशन
मसुरे | प्रतिनिधी : श्रावण मासानिमित्त अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने वटवृक्ष मंदिरात श्रावण मासारंभापासून भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. काल १७ ऑगस्ट ते बुधवार २३ ऑगस्ट २०२३ (निज श्रावण शुद्ध प्रतिपदा ते श्रावण शुद्ध सप्तमी) अखेर आयोजित या भागवत कथा सप्ताहात जालना जिल्ह्यातील अंबडचे ह.भ.प.श्रीहरी महाराज रसाळ हे भाविकांना भागवत कथेतून समुपदेशन करणार आहेत. हा सप्ताह वटवृक्ष मंदिरातल्या ज्योतिबा मंडपात दुपारी ४ ते ६ या वेळेत संपन्न होणार आहे, तरी भाविकांनी या भागवत कथा सप्ताह श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे. श्रावण मासातील प्रत्येक श्रावण सोमवारी वटवृक्ष मंदिरात नित्यनियमाने होणारी नैवेद्य आरती ११:३० वाजता न होता सायंकाळी ५:३० वाजता होईल. आरतीनंतर देवस्थानकडून प्रसाद वाटप करण्यात येईल. यानंतर रात्रीची शेजारती होणार नाही अशी माहिती पुरोहित व चोळप्पा महाराजांचे वंशज मोहनराव पुजारी यांनी दिली. याचीही भाविकांनी नोंद घ्यावी असे मंदिर समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार इत्यादी उपस्थित होते.