मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातील विविध रिक्षा थांब्यांवरील रिक्षा व्यावसायिक चालक – मालक यांनी स्वातंत्र्य दिना निमित्त सामाजिक बांधिलकीचा एक उपक्रम राबवला. यामध्ये ज्येष्ठ व युवा रिक्षा व्यावसायिक चालक मालक बांधव एकत्र आले होते.
रिक्षा व्यावसायिक हेमंत कांदळकर, निलेश लुडबे, बाबू हडकर, राजन वाघ, बाबा हडकर, नंदकिशोर गोसावी, मधुकर जाधव, धनेश हडकर यांनी एकत्र येत मालवण मधील फातिमा काॅन्व्हेंटच्या अनाथ मुलांना त्यांच्या व्यस्त दैनंदिन रिक्षा व्यवसायामधून काही वेळ दिला आणि एकत्रीत मदत केली. खाऊ, धान्य व इतर काही वस्तूंची मदत केलेल्या या सर्व रिक्षा व्यावसायिकांची मालवण शहरात प्रशंसा होत आहे. फातिमा काॅन्व्हेंटच्या प्रशासक सिस्टर व तिथल्या मुलांनीही या सर्वांचे आभार मानले आहेत.
या पूर्वीही २०२२ साली यातील रिक्षा व्यावसायिक चालक – मालक बांधवांनी एकत्र येऊन गवंडी वाडा येथील एका ज्येष्ठ नागरीक महिलेला पायाच्या उपचारासाठी मदत केली होती. यानंतरही गरज पडल्यास आपण सर्व रिक्षा व्यावसायिक चालक मालक बांधव एकत्र येऊन जमेल तशी यथाशक्ती सामाजिक मदत करायचा नेहमी प्रयत्न करू असे रिक्षा व्यावसायिक श्री. हेमंत कांदळकर यांनी सर्व रिक्षा व्यावसायिक चालक मालक यांच्या वतीने सांगितले आहे.