शालेय समितीचे सदस्य आशिष पेडणेकर यांच्या प्रयत्नांतून मालवण तालुक्यातील कबड्डी खेळाचे तज्ज्ञ प्रशिक्षक नितीन हडकर व त्यांचे सहकारी विवेक नेवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मार्गदर्शन उपक्रम.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ‘मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित, ओझर विद्यामंदिर, कांदळगांव’, प्रशालेमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी कबड्डी प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. ओझर विद्यामंदिर शालेय समितीचे सदस्य आशिष पेडणेकर यांच्या प्रयत्नातून मालवण तालुक्यातील कबड्डी खेळाचे तज्ज्ञ प्रशिक्षक नितीन हडकर व त्यांचे सहकारी विवेक नेवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. ओझर विद्यामंदिरमधील ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी काटक असल्याने त्यांना कबड्डी खेळाचे प्रशिक्षण देणे सोपे जाईल, असे प्रशिक्षक म्हणाले. या प्रशिक्षण वर्गामुळे ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचा कबड्डी खेळाविषयी आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे.
प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी प्रशालेचे जेष्ठ शिक्षक ए. ए. शेर्लेकर, पी.के. राणे, एन. एस. परुळेकर, एस. जे. सावंत उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कबड्डीचे मार्गदर्शन मिळत असल्याने पालक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. कबड्डी प्रशिक्षणाबरोबरच शाळेमध्ये टेबल टेनिस तसेच बॅडमिंटन खेळ सुरू करून मार्गदर्शन वर्गांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापक डि. डि. जाधव व शालेय समिती सदस्य आशिष पेडणेकर यांनी सांगितले.