मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ‘मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्या मंदिर, कांदळगांव’ प्रशालेमध्ये ७६ वा स्वातंत्र्य दिन वर्धापन दिन भरगच्च कार्यक्रमांनी उत्साहाने संपन्न झाला. कांदळगांव येथील स्वातंत्र्य सैनिक चंद्रकांत राघो परब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत व ध्वजगीत झाल्यानंतर सर विद्यामंदिरचे माजी मुख्याध्यापक प्रतापराव खोत यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. विद्यार्थिनी संचिता परब हिने स्वातंत्र्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच स्वातंत्र्य सैनिक चंद्रकांत परब यांनीही १९७१ च्या युद्धामधील आपले अनुभव कथन केले. त्यांचा शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन ओझर विद्यामंदिरच्या वतीने सत्कार करण्यात आला .
त्यानंतर ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते सादर केली. शाळेचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव तसेच विद्यार्थी अवधूत पारकर व रामचंद्र लाड यांनी संगीत साथ दिली. याप्रसंगी तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगान स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त गीत ‘दिली थेट भेट ही स्वातंत्र्याची’ या गीताचेही सादरीकरण करण्यात आले. या गीतामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना तालुकास्तरावर मिळालेली प्रशस्तीपत्रे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्वातंत्र्यदिनानिमित्त श्री. मयूर ढोलम यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप केले. तसेच प्रशालेच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. त्यानंतर मुलांचा कबड्डी व मुलींचा खो-खोचा प्रदर्शनीय सामना घेण्यात आला. या सामन्यांसाठी पंच म्हणून प्रशालेचे क्रीडाशिक्षक प्रवीण पारकर यांनी तर गुणलेखक म्हणून पी. के. राणे यांनी काम पाहिले. या कार्यक्रमप्रसंगी स्वातंत्र्य सैनिक चंद्रकांत राघो परब, शाळेचे माजी मुख्याध्यापक प्रतापराव खोत, मयूर ढोलम, जयश्री ढोलम, शेखर राणे, राकेश गांवकर, शाळेचे सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पारकर यांनी केले.