विश्वस्त मंडळाच्या सहकार्यामुळे ओझर शाळेची जलद गतीने प्रगती होण्यास मदत होईल असा मुख्याध्यापक डि. डि. जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या कांदळगांव येथील श्री. देव रामेश्वर देवस्थान आणि परिसर देवालये विश्वस्त मंडळ कांदळगाव, या संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. कांदळगांव देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने दरवर्षी अनेक धार्मिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक व शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. यावर्षी या विश्वस्त मंडळाच्या वतीने ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाबरोबरच संस्थेचा लोगो असलेला टाय आणि बेल्टसुद्धा उपलब्ध करून दिला आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रामेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या सर्व उपस्थित संचालकांचे स्वागत करण्यात आले. तसेच विश्वस्त मंडळाचे सचिव श्री. संतोष नारायण परब यांचा शाल आणि श्रीफळ देऊन प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या उपस्थित संचालकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. रामेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाने ओझर विद्यामंदिरच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविल्यास शाळेची जलद गतीने प्रगती होण्यास मदत होईल, असा गणवेश वितरण कार्यक्रम प्रसंगी बोलताना प्रशालेचे मुख्याध्यापक डी.डी जाधव त्यांनी विश्वास व्यक्त केला. कांदळगाव देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने सचिव श्री. संतोष परब, तसेच खजिनदार श्री. मधुसुदन परब यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त करून देवस्थान ट्रस्टच्या वतीने ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना यापुढेही शैक्षणिक मदत करणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी कांदळगाव देवस्थान विश्वस्त मंडळाचे सचिव संतोष परब, खजिनदार मधुसुदन परब, विश्वस्त संजय परब, बाबाजी परब, महादेव परब, प्रभाकर कांदळगावकर आणि सदानंद कदम इत्यादी मान्यवर तसेच ओझर विद्यामंदिरचे सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पी.के. राणे यांनी मानले.