जि.प.अध्यक्ष सौ.संजना सावंत यांनी केले लहानग्या विद्यार्थी वर्गाला विशेष मार्गदर्शन….!_
बांदा | राकेश परब : आपले आरोग्यमान चांगले राहण्यासाठी स्वच्छता महत्वाची आहे. सातत्यपूर्ण साबणाने हात व्यवस्थित धुतल्यास किरकोळ आजार होत नाहीत. प्रत्येक विद्यार्थ्याने यासाठी पुढाकार घेऊन आपल्या घरात स्वच्छतेचे महत्व सांगून स्वच्छतेचा वसा जोपासावा, असे आवाहन जि. प. अध्यक्ष सौ. संजना सावंत यांनी बांदा केंद्रशाळेत आयोजित कार्यक्रमात केले.
१५ ऑक्टोबर हा जागतिक हात धुणे दिन म्हणून साजरा केला जातो. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने बांदा जि. प. केंद्रशाळेत हा दिन साजरा करण्यात आला. यावेळी जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, जि. प. सदस्या श्वेता कोरगावकर, सावंतवाडी सभापती निकिता सावंत, उपसभापती शितल राऊळ, सरपंच अक्रम खान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, सावंतवाडी बीडीओ रविंद्र कणसे, व्ही. एम. नाईक, बांदा सरपंच अक्रम खान ,विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर ,आदी उपस्थित होते.
यावेळी जि.प.अध्यक्ष सौ. संजना सावंत यांनी बांदा केंद्रशाळेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. पटसंख्येअभावी मराठी शाळा बंद होण्याची परिस्थिती असताना बांदा शाळेची पटसंख्या ७० वरुन ३०० पार झाल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी राजेंद्र म्हापसेकर, सीईओ प्रजित नायर यानी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेसाठी साबण जमविण्यासाठी बांदा बाजारपेठतून रॅली काढण्यात आली.
कार्यक्रमाला ग्रा. पं. सदस्य मकरंद तोरसकर, किशोरी बांदेकर, रिया अल्मेडा, समिक्षा सावंत, मुख्याध्यापिका सरोज नाईक, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष निलेश मोरजकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, शाम सावंत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक ठाकूर, सुत्रसंचालन जे. डी. पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग यांनी परीश्रम घेतले.