नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अल्कोहोल ॲब्यूज ॲन्ड अल्कोहोलीझम ( NIAAA ) संस्थेद्वारे होते आहे सोपेपणाने जनजागृती.
आरोग्य | ब्युरो रिपोर्ट : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अल्कोहोल ॲब्यूज ॲन्ड अल्कोहोलीझम ( NIAAA ) संस्थेद्वारे १९७० सालापासून दारू तथा मद्यपान विषयक अभ्यास, मद्यपान व मानवी आरोग्य तसेच संयमी मद्यपान (सोशल ड्रिंकिग) विषयक कार्य शास्त्रोक्त पद्धतीने सुरु आहे. सध्या ‘ड्राय मंथ थिअरी’ अंतर्गत संयमी दारू पिणार्यांसाठीही या संस्थेने आरोग्य विषयक काही उपाय सुचवले आहेत. ऑगस्ट २०२३ पासून ही ‘ड्राय मंथ थिअरी’ या इन्स्टिट्यूट मधील एका नवीन अभ्यासाचा आयाम गाठण्याचे उद्दिष्ट धरून संस्था जगभर कार्य करणार आहे. ‘नशामुक्त भारत’ सारख्या संकल्पनांना या अभ्यासाचा शास्त्रोक्त फायदा होऊ शकतो असे भारतातील सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. या संस्थेचे मुख्य संचालक जाॅन. एफ. कूब. लवकरच भारतात या संदर्भातील शास्त्रोक्त अभ्यासाची प्रणाली विकसीत करण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे भारतातील बिगर सरकारी आरोग्य अभ्यासकांनी ( NGO ) स्पष्ट केले आहे.
मद्यपान हे व्यसन आरोग्यासाठी धोकादायक असते. यामुळे शरीरावर गंभीर परिणाम होतात. लिव्हर, किडनी आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. मानसीक आरोग्यावर देखील याचा तीव्र परिणाम होतो. मध्यम स्वरुपाचे मद्यपान आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते पण जास्त प्रमाणात मद्य घेणे व सलग वर्षभर मद्य घेणे धोकादायक ठरू शकते. जर एक महिना मद्यपान केले नाही तर त्यामुळे आरोग्यात सकारात्मक बदल दिसू लागतात.
एक महिना मद्यपान केले नाही तर शरीरावर चांगले परिणाम स्पष्ट दिसतात असे या संस्थेच्या अभ्यासकांनी नमूद केले आहे. जगभरातल्या अनेक संस्कृती आणि समाजांमध्ये दैनंदिन जीवनात व सणासुदीला मद्यपान करणे हे खोलवर रुजलेले आहे. पण जास्त प्रमाणात मद्यपान आरोग्यावर विपरित परिणाम करू शकते. आरोग्यासाठी जर एक महिना मद्यपान सोडले तर याला ‘ड्राय मंथ’ असं संबोधले जाते. महिन्याच्या सुरुवातीला मद्यपान थांबवल्यानंतर जसजसे दिवस पुढे जातात तसतसे यकृत तथा लिव्हरवर चांगले परिणाम होतात. डिटॉक्सिफिकेशन ( विषारी घटकांचा निचरा किंवा शोधन ), चयापचय आणि पोषक घटकांची साठवण यात लिव्हर महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते त्यामुळे मद्यपानापासून दूर राहिल्याने लिव्हरमध्ये होणारी जळजळ आणि चरबीचा संचय कमी होऊ शकतो. यामुळे लिव्हरचे एकूण कार्य सुधारते. परिणामी, एकूण आरोग्यावर सकारात्मक परिणाम जाणवू लागतो. मद्यपान थांबल्या नंतर केल्यानंतर शरीर डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया सुरू करते.
अल्कोहोलचे चयापचय करण्याची जबाबदारी लिव्हरची आहे. मद्यपान थांबवल्यानंतर लिव्हरला विषारी पदार्थांवर कार्यक्षमतेने प्रक्रिया करण्यास वेळ मिळतो. पहिल्या आठवड्यात चिडचिड, मूड बदलणे आणि झोपेची अडचण अशी लक्षणे दिसू शकतात. त्यानंतर झोपेच्या गुणवत्तेत सुधारणा दिसून येते. अल्कोहोल मुळे झोपेचे चक्र विशेषतः डोळ्यांच्या जलद हालचालींमध्ये व्यत्यय आणते व यासाठी विश्रांतीची गरज असते. मद्यपान न केल्याने अधिक शांत झोप लागण्याची शक्यता वाढते.
डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया सुरू राहिल्याने बऱ्याच व्यक्तींनी दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुधारित मानसिक स्पष्टता आणि मूड बदलण्याबाबत तक्रारी संस्थेकडे केल्या. अल्कोहोलमुळे मध्यवर्ती मज्जासंस्थेवर प्रभाव वाढतो परिणामी दुःख आणि चिंतेची भावना येऊ शकते. पण निश्चयाने व संयमाने अल्कोहोलपासून दूर राहिल्याने मानवी मेंदूतील रसायने पुन्हा संतुलित होण्यास सुरूवात होते. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन आणि ऊर्जा पातळी वाढते.मद्यपान बंद केल्यानंतर तिसऱ्या आठवड्यापर्यंत शारीरिक फायदे दिसू लागतात. अल्कोहोल हे कॅलरीजनी भरलेले असते. अनेकदा मद्यपानसोबत आरोग्यास अपायकारक असलेले स्नॅक ( चखणा किंवा फास्ट जंक फूड) घेतलं जाते त्याचाही वेगळा दुष्परिणाम शरिरावर होत असतो.
एक महिना मद्यपान न केल्यास वजन कमी होण्यास किंवा वजनाचे उत्तम व्यवस्थापन करण्यास हातभार लागतो असा दावा NIAAA संस्थेने केला आहे. अल्कोहोल निर्जलीकरण करते. त्यामुळे त्वचेवर परिणाम होतो. शरीर हायड्रेट होऊ लागले की मनुष्य ताजा तवाना दिसू लागतो आणि त्वचेचा रंगही बदलतो. त्यामुळे हळूहळू मद्यपानाचे व्यसन सोडल्यास त्याचे आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसू लागतात. ‘ड्राय मंथ थिअरी’ किंवा एक महिना दारू थांबवणे ही संकल्पना केवळ संयमी दारू पिणार्यांसाठी आहे. अती प्रमाणात मद्यपान करणार्यांनी कायमस्वरूपी दारू थांबवणे हाच आरोग्य विषयक सकारात्मक पर्याय असल्याचे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अल्कोहोल ॲब्यूज ॲन्ड अल्कोहोलीझम’ मुख्य संचालक जाॅन. एफ. कूब यांनी स्पष्ट केले आहे. मद्यपान करणे हे वेडेपण किंवा कमजोरी नसून तो एक आजार असल्याचे ‘जागतीक आरोग्य संघटना’ यांच्या अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे परंतु ते या विषयावर केवळ ढोबळमानाने कार्य करत आहेत. NIAAA या बद्दल सखोल, समजायला सोपा व सर्व स्तरांवर १९७० सालापासून सेवाभावी तरिही व्यावसायिक पद्धतीने अभ्यास करत आहे व करतच राहील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.