मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवलीतील बहुआयामी व्यक्तिमत्व किशोर कदम यांची झिम्माड महोत्सव-२०२३ च्या स्वागताध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. झिम्माड महोत्सवाच्या संयोजिका व महाराष्ट्र कला रसिक संस्थेच्या अध्यक्ष वृषाली विनायक यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
कणकवलीतील कलमठ या गांवी राहणारे किशोर कदम जिल्हा परिषदेच्या ओसरगांव येथील शाळेत मुख्याध्यापक आहेत. लेखन वाचनाची आवड असलेले किशोर कदम एक उत्तम साहित्यरसिक आहेत. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे महासचिव आहेत. फुले आंबेडकर दर्पण प्रबोधिनीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे.
किशोर कदम यांची रसिकता व सामाजिक शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशनने महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवलं आहे. कोल्हापूरच्या जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेचा पर्यावरण जागृती गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. किशोर कदम यांच्या निवडी बद्दल अभिनंदन होत आहे.