महागाई, बेरोजगारी, बंद होत असलेले उद्योगधंदे यावर कधीतरी राणे बंधुनी भाष्य करावे असा दिला सल्ला.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी मालवण येथील पक्षाच्या तालुका शाखेत आज एक पत्रकार परीषद घेतली. तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की आगामी निवडणुकीत खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या विजयाची हॅटट्रीक होणार असा विश्वास आहे. याच दरम्यान त्यांनी विरोधकांच्या विविध टीकांचा समाचार घेतला. भाजपा व राणे कुटुंबियांनी मागील पराभवातून बोध घ्यायचाही त्यांनी सल्ला दिला.
माजी खासदार डाॅ. निलेश राणे, आमदार नितेश राणे यांना आपण कोणावर टिका करतो याचाही विचार त्यांना राहिलेला नाही असे सांगितले. भूतपूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाबद्दल संपूर्ण देशाने कौतुक केले आहे आणि भविष्यातील निवडणुकांमध्येही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची सत्ता राज्यात येणार असल्याचे माहीत असल्यानेच भाजप निवडणुका घेण्यास घाबरत आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. राणे बंधुनी स्वतःला लगाम लावला नाही तर त्यांना ठाकरे शिवसेनेच्यावतीने रस्त्यावर उतरून योग्य तो धडा शिकवला जाईल असा इशाराही हरी खोबरेकर यांनी यावेळी दिला. कणकवली -देवगड- वैभववाडी मतदार संघात जागोजागी खड्डे दिसतील परंतु कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघातील खड्डा शोधण्यासाठी माजी खासदार डाॅ निलेश राणे यांना पायपीट करावी लागली होती असा उपरोधक टोला त्यांनी लगावला. महागाई, बेरोजगारी, बंद होत असलेले उद्योगधंदे यावर कधीतरी राणे बंधुनी भाष्य करावे आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोडवे गाऊन जनतेच्या समस्या सुटणार नाहीत तर जनतेला अपेक्षीत असलेले काम आजही भाजपकडून होत नसल्याचे चित्र असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केली.
या पत्रकार परिषदेला मालवण शहरप्रमुख बाबी जोगी, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, सन्मेष परब, हेमंत मोंडकर, उमेश चव्हाण, सिद्धेश मांजरेकर, प्रविण लुडबे, दत्ता पोईपकर, अक्षय भोसले, गौरव वेर्लेकर असे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.