मालवण | सुयोग पंडित : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख राजू शेटये यांनी कोकण विभागीय आयुक्तांच्या जिल्हा दौर्याच्या पार्श्वभूमीवर महसूल विभाग व भाजपावर कडाडून टीका करत शाब्दिक तोफ डागली आहे.
कोकण विभागाचे विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर हे दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर येत आहेत. यादरम्यान जिल्ह्यातील चार हॉटेल्समध्ये ते थांबणार आहेत. एकिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल विभाग अनेक ठिकाणी अवैधरित्या काम करत आहे व महसूल विभागातील अनेक कामे रखडली आहेत. महसूल विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याकडे महसूल विभाग दुर्लक्ष करत असून अद्यापपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही. तसेच कोकण विभागीय आयुक्तांकडे अनेक अपील दाखल आहेत. परंतु त्यावर निर्णय झालेले नाहीत.तर दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर येणारे कोकण आयुक्त महेंद्र कल्याणकर हे जिल्ह्यातील चार-चार हॉटेल्समध्ये फिरणार आहेत. महसूल विभागाने त्यांच्या चांगली खातिरदारीची व्यवस्था केली आहे. त्यामुळे कोकण विभागीय आयुक्तांचा सिंधुदुर्ग दौरा महसूल विभागाचे प्रश्न सोडविण्यासाठी आहे की जिल्ह्यातील हॉटेल्स फिरण्यासाठी आहे असा संतप्त सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख राजू शेटये यांनी करत याला सर्वस्वी भाजप सरकार जबाबदार आहे. कोकण आयुक्तांच्या या दौऱ्यातून सिंधुदुर्गला काय मिळणार? त्यामुळे कोकण आयुक्तांच्या दौऱ्याची चौकशी होण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार करण्याची आणि अधिवेशनात यासंदर्भात आवाज उठविण्याची मागणी करणार असल्याचे राजू शेटये यांनी सांगितले आहे.