ब्युरो न्यूज : स्वतःच्याच देशाच्या तिजोरीवर डल्ला मारल्याच्या आरोपावरून, विलासी जीवनशैलीसाठी प्रसिद्ध असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान ख़ान तोशाखाना प्रकरणी आज तीन वर्षांच्या कारावास आणि एक लाख रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे आता इम्रान ख़ान हे पाच वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीत. २०१८ मध्ये पाकिस्तानमध्ये इम्रान ख़ान यांचे सरकार सत्तेवर आले. या काळात त्यांना अरब शासकांकडून अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या. भेटवस्तूंमध्ये एक महागडी मनगटी घड्याळ, कफलिंकची एक जोडी, एक महागडा पेन, एक अंगठी आणि चार रोलेक्स घड्याळांचा समावेश होता. त्या तोशाखान्यात (देशातील गोदाम) जमा करण्यात आल्या. नंतर त्यांनी सवलतीच्या दरामध्ये त्या वस्तू विकत घेतल्या आणि मोठ्या नफ्यात त्याची विक्री करण्यात आली, असा आरोप विरोधी पक्षांनी इम्रान खान यांच्यावर केला होता. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी इम्रान यांनी सांगितले होते काही कोटी रुपये भरल्यानंतर राज्याच्या तिजोरीतून खरेदी केलेल्या भेटवस्तूंच्या विक्रीतून सुमारे ५८ लाख रुपये मिळाले होते. यामध्ये कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचा दावाही त्यांनी केला होता. या प्रकरणी २८ फेब्रुवारी रोजी सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते.
निवडणूक आयोगाने तोशाखाना प्रकरणात खोटी विधाने केल्याबद्दल पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी संसदेच्या सदस्यत्वापासून अपात्र ठरवले आहे. पाकिस्तानी कायद्यानुसार, परदेशातील मान्यवरांकडून मिळालेली कोणतीही भेटवस्तू स्टेट डिपॉझिटरी किंवा तोशाखान्यात ठेवली पाहिजे. जर राज्याच्या प्रमुखाला भेटवस्तू ठेवायची असेल तर त्याला त्याच्या किंमतीइतकी रक्कम द्यावी लागेल. हे लिलाव प्रक्रियेद्वारे ठरवले जाते. या भेटवस्तू एकतर तोशाखान्यात ठेवल्या जातात किंवा त्याचा लिलाव केला जाऊ शकतो आणि त्यातून मिळणारा पैसा राष्ट्रीय तिजोरीत जमा होतो.
या निकालानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या राजकीय मंडळींच्या राष्ट्रीय निष्ठेविषयी कडक धोरण अवलंबले पाहिजे असे तेथील स्थानिक सामाजिक व राजकीय तज्ञांनी सूचीत केले आहे. एकंदरीतच आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान ख़ान हे स्वतःच्याच देशाचे नुकसान करणे व शिक्षा जाहीर होणे यामुळे ‘हिट विकेट’ तथा स्वयंचित झाल्याचे बोलले जात आहे.