सिनेपट | प्रतिनिधी : अक्षय कुमारचा अभिनय असलेला बहुचर्चित व बहुप्रतिक्षित ‘ओ एम जी २’ सिनेमाला प्रदर्शनापूर्वीच जोरदार झटका लागल्याचे सूत्रांकडून समजते. या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आली आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. पण हा चित्रपट अद्याप सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनमध्ये अडकला आहे. सेन्सॉर बॉर्डाने प्रमाणपत्र देण्याआधी हा चित्रपट पुनर्विचार समिती कडे पाठवला. आता या रिव्हाईजिंग कमिटीने या चित्रपटामध्ये २० ठिकाणी कात्री चालवण्याची संकलन शिफारस केली आहे. सेन्सॉर बोर्डाच्या पुनर्विचार समितीनेही या सिनेमावर आक्षेप नोंदवला असून सिनेमेला ‘ए’ म्हणजेच फक्त प्रौढांसाठी प्रमाणपत्र देण्याबाबत बोलले आहे. सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या सर्व बदलांनंतरच ‘ओह माय गॉड २’ ला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र दिले जाऊ शकते. पण CBFC ने सुचवलेले सर्व बदल आणि रिव्हाईजिंग कमिटीचं चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र देण्याबाबत बोलणे चित्रपटाच्या निर्मात्यांना मान्य नाही. या संदर्भात चित्रपटाच्या निर्मात्यांना लवकरच सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन त्यांचे म्हणणे मांडायचे आहे, अशीही माहिती सूत्रांकडून समजते आहे.
अक्षय कुमारचा चित्रपट ‘ओह माय गॉड २’ हा केवळ धर्म आणि श्रद्धेवर आधारित सिनेमा नसून या चित्रपटाचा मूळ विषय हा लैंगिक शिक्षण आहे. अशा परिस्थितीत धर्म आणि लैंगिक शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर बनलेल्या या चित्रपटाबाबत सेन्सॉर बोर्ड गांभीर्याने विचार करत आहे.
‘ओएमजी २’ या चित्रपटाच्या टीझरमधील एका दृष्यावर नेटकऱ्यांनी टीका केली होती. या सीनमध्ये दिसले की रेल्वेच्या पाण्याने अक्षयचा अभिषेक केला जात आहे. ‘ओएमजी २’ या चित्रपटात अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामधील ‘ऊंची ऊंची वादी’ हे गाणे काही दिवसांपूर्वी रिलीज झाले. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. तसेच या चित्रपटाचा टीझर देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.