जिल्ह्यातील वीजेच्या तुटलेल्या तारा व मुक्या जिवांच्या सुरक्षिततेविषयी गांभीर्याने विचार कधी होणार..?
नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नापणे येथील शेतकरी दत्ताराम कोंडू काळे यांच्या मालकिच्या तीन शेळ्यांचा विद्युत वाहिनीचे धक्का लागून अंत झाला. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे तीस ते पस्तीस हजाराचे नुकसान झाले आहे. परंतु या घटनेमुळे वीज वितरण यंत्रणेचा हलगर्जीपणा व बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे अशीच स्थानिकांची प्रतिक्रिया आहे.
काळे हे नेहमीप्रमाणे शेळ्यांना चरण्यासाठी घेऊन रानात गेले होते. रविवार दुपारी २ वाजताच्या सुमारास नापणे रेल्वे स्थानक नजीक माळरानावर शेळ्या चरत असताना विद्युत वितरण कंपनीची विद्युत वहिनी तुटून पडली होती. यातच ३ शेळ्या जागीच मरण पावल्या. याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी आणि विद्युत वितरण कंपनीचे श्री कानडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील वीजेच्या तुटलेल्या तारा व मुक्या जिवांच्या सुरक्षिततेविषयी गांभीर्याने विचार कधी होणार असाच प्रश्न सध्या जिल्ह्यातील पशूपालक शेतकरी यांना पडत आहे. २ दिवसांपूर्वी मालवण तालुक्यातल्या चिंदर माळरानावर अशाच घटनेत एका गायीचा दुर्दैवी अंत झाला होता.