बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथील व्हि.एन. नाबर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना नुकताच थेट शेतात उतरुन ‘तरवा’ लावायचा अनुभव मिळाला.
पावसाने जोर धरताच सर्वत्र शेती कामेही जोरदार सुरू आहेत. अशातच व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीअम स्कूल, बांदा शाळेतील ७ वी व ८ वी इयत्तांतील विद्यार्थ्यांना शेतीकामाचा अनुभव देण्यासाठी तरवा लावणे हा उपक्रम घेण्यात आला. या अंतर्गत मुलांना न्हावेली येथील सामाजिक कार्यकर्ते श्री बंटी नाईक यांच्या शेतात काम करण्याची संधी मिळाली. सकाळी माजी ग्रामपंचायत सदस्य श्री आनंद नाईक यांच्या घरी पोहोचल्यावर चहापाणी करून सर्वांना बंटी नाईक यांच्या शेतावर नेण्यात आले. त्याठिकाणी तरवा कसा लावावा याची माहिती मुलांना देण्यात आली. दिलेल्या माहितीच्या आधारे मुलांनी शेतजमीनीत रोपे लावली. चार बाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या व नैसर्गिक संपत्तीने खुललेल्या सुंदर अशा न्हावेली गावातील हा शेतीचा अनुभव काही वेगळाच होता. मातीशी नातं घट्ट करणारा हा अनुभव मुलांनाही खूपच मनाला भावला. चिखल मातीत मनसोक्त वावरल्यावर सर्व मुलं परत श्री आनंद नाईक यांच्या घरी आली. गरम पाण्याने हात पाय धुतल्यावर सर्वांना गरम गरम जेवण देण्यात आले. शारीरिक श्रमांमुळे सर्वांनाच जोरदार भूक लागली होती सर्वजण तृप्तपणे जेवले.
आपल्या शेतात काम करायला दिल्याबद्दल तसेच जेवणाची उत्कृष्ट सोय केल्याबद्दल श्री आनंद नाईक व बंटी नाईक यांचे शाळेतर्फे आभार मानून सर्व विद्यार्थी शाळेत परतले. शिवसेना जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनीही आवर्जून भेट देत प्रशालेच्या शेतीविषयक उपक्रमाचे कौतुक केले. आता हे विद्यार्थी विद्यार्थिनी काही प्रमाणात ‘तरवा’ या उपक्रमात थेट अनुभव घेऊन तरबेज झाल्याची कौतुकाची भावना उपस्थित सर्वांनी व्यक्त केली.
यावेळी माजगांव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आबा सावंत उपस्थित होते. दरम्यान, मळेवाड ग्रामपंचायतीचे सदस्य अमोल नाईक हे ही मुलांसोबत शेतीच्या कामात सहभागी झाले होते.
या उपक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई शिक्षक श्रीमती रसिका वाटवे सौ. कल्पना परब श्री प्रशांत देसाई व श्री हर्षद खडपकर सहभागी झाले होते. प्रशालेच्या या उपक्रमाची सध्या सामाजिक स्तरावर सर्वत्र प्रशंसा होत आहे.