मसुरे | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य शासनाकडून सर्वसमावेशक पीक विमा योजना म्हणून शेतकऱ्यांना ‘एका रुपयात पीक विमा’ मिळणार आहे. या पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी पीक विमा पोर्टल १ जुलै २०२३ पासून सुरू झाले आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२३ ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मालवण तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी केले आहे.
विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी पीक विमा योजना आहे. निर्धारित केलेल्या विमा हप्त्याच्या शेतकरी हिश्श्याच्या अनुक्रमे १०३५.२० रु. आणि ४०० रुपयांपैकी केवळ १ रुपया भरून शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होण्यासाठी विमा योजनेत भाग घेण्याच्या अंतिम दिनांका आधी किमान ७ दिवस संबंधित बँकेला विमा हप्ता न भरण्याबाबत लेखी कळवणे गरजेचे आहे.
इतर बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला ७/ १२ चा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड, पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन बँकेत विमा अर्ज देऊन, हप्ता भरून सहभाग घ्यावा. हप्ता भरलेली पोचपावती त्याने जपून ठेवावी. कॉमन सर्व्हिस सेंटर, आपले सरकार सेवा केंद्राच्या मदतीने शेतकरी विमा योजनेत सहभाग घेणे शक्य आहे. तसेच www. pmfby.gov.in या पोर्टलच्या मदतीने देखील सहभाग घेता येणार आहे. सर्वसमावेशक पीक विमा योजना” राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतक-यांना केवळ १/- रुपया भरून PMFBY पोर्टल https://pmfby.gov.in वर स्वत: शेतकरी यांना तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामुहिक सेवा केंद्र (CSC) यांचे मार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करता येईल. पिक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामुहिक सेवा केंद्र (CSC) केंद्र धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम रु. ४०/- देण्यात येते. या व्यतिरीक्त राज्यातील काही सामुहिक सेवा केंद्र (CSC) धारकाकडून शेतक-यांकडून अतिरीक्त पैसे घेण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांन कडून अतिरिक्त शुल्क घेऊ नये.
या विम्यांतर्गत पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकाच्या उत्पादनात येणारी घट, प्रतिकूल हवामानामुळे पीक पेरणी, लावणी झाली नसल्यास हंगामातील पूर, दुष्काळामध्ये झालेले नुकसान, काढणी पश्चात नुकसान झाल्यास नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई मिळते. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी घ्यावा असे आवाहन कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी केले आहे.