मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या परब मराठा माळगांव येथील दशावतार कलाकार विराज माळगांवकर यांना ‘परब मराठा समाज’ यांच्या वतीने नुकतीच रोख आर्थिक मदत करण्यात आली. दशावतार कलाकार विराज माळगांवकर यांची आर्थिक परिस्थिती खालावल्याने आणि राहते घर नादुरुस्त झाल्यामुळे त्यांच्यासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. नुकतीच विराज यांच्या आईचे सुद्धा निधन झाले होते. या सर्व खडतर परिस्थितीमुळे त्यांना मोठ्या कष्टाचा सामना करावा लागत होता. या सर्व बाबींची माहिती परब मराठा समाजाला कळतात परब मराठा समाजाच्या वतीने विराज यांना त्यांच्या घरी जाऊन रोख आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी परब मराठा समाजाचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे उपाध्यक्ष उद्योजक डॉक्टर श्रीकृष्ण उर्फ दीपक मुळीक परब, सिंधुदुर्ग जिल्हा परब मराठा समाज संघटक विनायक परब, माजी कार्याध्यक्ष प्रकाश परब, मालवण तालुका परब मराठा समाज संघटक जयद्रथ परब, मानवधिकार समिती जिल्हा सचिव अर्जुन परब, आमडोस माजी सरपंच दिलीप परब, पत्रकार व महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स, इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रीकल्चरचे सदस्य दत्तप्रसाद पेडणेकर आणि परब मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
आपली गरज ओळखून परब मराठा समाजाने योग्य वेळी जे आर्थिक स्वरूपात सहकार्य केले आहे त्याचे ॠण विराज माळगांवकर यांनी व्यक्त करून सर्वांचे आभार मानले. विराज माळगांवकर याला त्याचे घर नूतनीकरण करण्याप्रसंगी वस्तू रुपात योग्य ते सहकार्य परब मराठा समाजाच्या वतीने करण्याचा मानस डॉक्टर दीपक मुळीक परब यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. श्री जयद्रथ परब यांनी विराज याच्या पाठीशी परब मराठा समाज कायम राहील असेही अभिवचन या वेळी दिले.