विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा शिवसेनेत प्रवेश.
मुंबई | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना अनेक लोकहिताचे प्रकल्प राजकीय सूडबुध्दीतून बंद करण्यात आले होते. त्या सरकारमध्ये सगळे अहंकाराने भरले होते, सर्वांना प्रचंड इगो होता, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. मात्र शिवसेना भाजप युतीचे सरकार गेल्यावर्षी सत्तेत आल्यानंतर आम्ही या बंद करण्यात आलेल्या लोकहिताच्या प्रकल्पांना चालना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारडून राज्याच्या विकासकामांना आवश्यक तेवढा निधी मिळतो. राज्याच्या प्रत्येक विकासाच्या प्रस्तावाला पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे राज्याच्या विकासाला वेग आला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचा विकास मंदावला होता आता आम्ही पुन्हा जोमाने काम करुन २०१४ च्या सरकारमधील लोकहिताचे प्रकल्प आम्ही सुरु केले आहेत. महाविकास आघाडी सरकार केंद्राकडून निधी मिळत नसल्याची बोंब करत होती, मात्र कोणी निधी आणून देत नाही त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सगळे प्रकल्प थंडावले होते. आता राज्य पुन्हा प्रगतीपथावर वेगाने जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवेसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन, प्रविण दरेकर उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने बाळासाहेबांची शिवसेना हीच अधिकृत शिवसेना असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेवर सर्वांचा विश्वास आहे त्यामुळे हे प्रवेश होत आहेत, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हा देश महासत्तेकडे नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. आजचा प्रवेश ऐतिहासिक आहे, गोऱ्हेंच्या प्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहेत. शिवसेना भाजप युती मजबूत आहे व मनापासून झालेली आहे, हे यातून समोर आले आहे. आमची युती वैचारिक युती आहे. बाळासाहेबांच्या विचाराने प्रभावित होऊन हे युती सरकार आले आहे. वर्षभरात धडाकेबाज निर्णय घेतले. लोकांच्या मनात स्थान मिळाले आहे. २०१४ ते २०१९ खऱ्या अर्थाने युतीचे सरकार होते. लोकहिताचे निर्णय घेतले गेले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोकहिताच्या कामांवर मर्यादा आली, अनेक प्रकल्प राजकीय हेतूने बंद करण्यात आले. मात्र आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर लोकहिताचे, विकासाचे प्रकल्पांना वेग आला. आम्ही विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांना चालना दिली. शिवसेना व धनुष्यबाणावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. मात्र काही जण त्यांच्या समाधानासाठी आपल्या सोयीचा अर्थ काढत असल्याचा टोला त्यांनी लगावला. बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले काम, त्यांची भूमिका घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला पुढे नेत आहेत. त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो. स्वप्नवत वाटणारी कामे मोदींच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वास जात आहेत. बाळासाहेबांच्या भूमिकेसोबत कधीही तडजोड होणार नाही, याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. शिवसेना भाजप युती त्यांच्या विचारांवर झाली आहे. त्यांचे विचार मोदी-शहा पुढे नेत आहेत. राम मंदिर उभारणी वेळी चेष्टा झाली मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ही महत्त्वाची सर्व कामे पू्र्ण होत आहेत, असे ते म्हणाले.
यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या, राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण शिवसेनेत प्रवेश करत आहोत. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच अधिकृत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन शिक्कामोर्तब केले आहे. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावर शिवसेना योग्य मार्गावर आहे. महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेत आपण कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अयोध्येत राम मंदिर, समान नागरी कायद्याबाबत सकारात्मक पावले, तलाक पीडित महिलांना न्याय, काश्मिरमध्ये तिरंगा, बाळासाहेबांनी ज्या भूमिकांसाठी आयुष्य समर्पित केले त्यांच्यासाठी काम केले जात आहे, त्यामुळे आपण बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे त्या म्हणाल्या. कोणत्याही सटरफटर लोकांमुळे नाराज होण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांना लगावला.
महिला विकास व महाराष्ट्र, देशविकासाच्या या प्रश्नावर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने काम करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. १९९८ यावर्षी म्हणजे २५ वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील राजकीय विश्वासार्हता, मराठी व हिंदुत्व, महिला धोरण तसेच सामाजिक न्याय या प्रश्नावर असणारा एनडीए सोबत असणारा राजकिय पक्ष म्हणजे शिवसेना या पक्षात मी प्रवेश केला होता. शिवसेनेत मला खूप चांगले काम करता आले. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची वरील सर्व समस्यांवर चांगली इच्छाशक्ती दिसत आहे. विशेषतः १९८५ च्या शहाबानो बेगम खटल्यात न्यायालयाने शहाबानो ला पोटगी मिळावी असा निर्णय दिला होता. तथापि विरोधाला व दबावाला बळी पडून तत्कालीन सरकारने मुस्लिम महिला (घटस्फोट अधिकारांचे संरक्षण) कायदा १९८६ संमत केला. परिणामी समाजातील विशिष्ट घटकातील स्त्रियांना दुजाभाव व अन्याय सहन करावा लागला. त्यामुळे सर्व महिलांना त्यांच्या व्यक्तिगत जीवनात समान न्याय मिळावा अशी आवश्यकता आहे. विशेष म्हणजे गोव्यातील कायदा समान नागरी कायदा मानला जातो. परंतु तो कायदा भारतीय राज्य घटनेवर आधारित नसून तो पोर्तुगीज कायद्यावर आधारित होता.
राष्ट्रीय स्तरावरील या भूमिका घेऊन देशात व राज्यात युतीचे सरकार हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या भूमिकांवर आयुष्य समर्पित केले, त्या भूमिकांचा सन्मान करून काम करत आहे. राष्ट्रीयत्व म्हणजेच हिंदुत्व या भूमिकेसोबतच महिला विकासाला चालना, महिला व बालके, वंचित घटक, आदिवासी, असंघटित कामगार, शेतकरी यांच्या प्रश्नावर धोरणात्मक व प्रत्यक्ष कामाची गरज आहे. हे सर्व काम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मी शिवसेनेच्या भूमिकेचे समर्थन करते व तसे काम करण्याचा निर्णय घेत आहे, असे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. मी उपसभापती पदावर असल्याने त्या वैधानिक पदाच्या चौकटीचा सन्मान करतच हे काम करणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कौतुक केले. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. आमची युती भावनात्मक आहे. नीलम गोऱ्हेंनी अतिशय चांगला निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.
फोटो सौजन्य : मुंबई ब्युरो ( गुगल द्वारे गणेश शिर्सेकर )