मालवण | सुयोग पंडित : “कुछ़ पाकर ख़ोना है…कुछ ख़ोकर पाना है…जीवन का मतलब तो…आना और जाना है…”, या ओळी,’ आरंभ ते अंत’ एवढ्या शाब्दिक जीवन प्रवासाच्या प्रतिकात्मक तटस्थता दर्शवितात. या दोन ओळींमध्ये माणुस कुठे कुठे जागतो…चालतो…धावतो.. थकतो… वस्ती करतो…विश्रांती घेतो…नवचैतन्य जागवतो यांतून जे काही मिळते तो संचय असतो. हा संचय अपव्यय ठरू नये म्हणून जे झटतात अशा व्यक्तिमत्वांना सौ.शिल्पा यतीन खोत म्हणतात.
मालवणच्या समाजसेवी, छत्रपती शिवराय प्रेमी, प्राणी मित्र , सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या अध्यक्ष व क्रियाशील सदस्य, माजी पंचायत समिती सभापती पूनम खोत व ज्येष्ठ व्यावसायिक परशुराम खोत यांच्या स्नुषा, माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या पत्नी आणि अडिअडचणीला सदैव जिचा फोन ‘उपलब्ध’ असतो अशी अनेक मित्र-मैत्रीण व भाऊ बहिणींची ‘आपली शिल्पा’ असे त्यांचे खूप भरीव ‘प्रोफाईल’ आहे. वरील नमूद केलेली प्रत्येक गोष्ट लिहीता वाचताना सोपी किंवा सहज प्रशंसेची वाटते पण त्या प्रत्येक गोष्टीत वेगवेगळ्या जबाबदारीचा वेगवेगळा अथक घटक आहे. यात त्यांचे ‘मातृत्व’ हा सुद्धा सर्वात महत्वाचा घटक आहेच परंतु तो कौटुंबिक स्तरावरील असल्याने त्याकडे सामाजिक उद्देशाच्या नजरेने सहसा पाहिले जात नाही परंतु तो ही घटक त्या तितक्याच ताकदीने पेलून समाजात योगदान देतात हे सुद्धा मुद्दाम नमूद करावे लागेल.
सौ.शिल्पा खोत यांच्याकडे अतिशय उत्तम शिक्षण, वाचन लेखन याची जन्मजात आवड आहे. ते वाचलेले सगळे ज्ञान पेरत, कसवत समाजाला सतत काहीतरी देत रहायचा त्यांचा ध्यास असतो आणि गेली १० वर्षे त्या ध्यासाचा संचय करत करत जगणे हेच त्यांचे आपसूक जीवन बनून गेले आहे. त्यांच्याकडे छोटी मुले, स्त्री वर्ग आणि गरजू या मानवी जाणिवांसोबत त्यांच्यात पशू-पक्षी तथा प्राणी मित्रत्वाचे क्रियाशील मन सुद्धा आहे.
राजकीय व सामाजिक क्षेत्रांच्या संगमावरील त्या एक युवा नेतृत्व आहेत. त्यांच्याकडे कुडाळ-मालवण युवती सेना प्रमुख समन्वयक अशी एक व्यापक जबाबदारी आहे. कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांनी त्यांच्या सामाजिक क्रियाशिलतेला आणखीन चालना मिळावी हा उद्देश ठेवून दिलेली जबाबदारी त्या तितक्याच ध्यासाने पेलतात आणि त्यांच्या संचयात आता व्यापक स्तरावरील वाढ होते. ‘भरारी किंवा झेप’ अशा गोष्टींसाठी त्या आतुर नसतात तर जे कोणी भरारी घेऊ इच्छितात त्यांना चालना,त्यांचे कौतुक आणि त्यांच्यासाठी एक मंच द्यायचा त्या ध्यास बाळगतात…तो ही एक संचय बनून जातो. मध्यम युवा वयात प्रगल्भतेचीही कसोटी लागते. “आपल्याला सगळे येते किंवा आपण सर्वज्ञानी आहोत” अशा भ्रमात त्या नक्कीच नसतात परंतु विनाकारण निष्क्रीय सामाजिक व्यक्ती किंवा घटकांकडून त्यांना ज्ञानामृत पाजायचा प्रयत्न झाला तर त्यांच्यातील ‘अस्सल मालवणी वाघीण’ जागृत होते. ज्ञान द्यावे पण ते कुठे, कोणी व कधी यांबाबत त्यांची ठाम मते आहेत.
कु. शिल्पा परब…सौ.शिल्पा यतीन खोत…सौ.शिल्पा खोत…युवती सेना प्रमुख समन्वयक सौ शिल्पा यतीन खोत अशा सह्याद्रीच्या एक एक कड्यांप्रमाणे जबाबदारी वाढवत जाणार्या कंगोर्यांचा त्यांचा ध्यास ही एक संचयनीची सुरु असलेली कहाणी म्हणता येईल..!
सौ. शिल्पा यतीन खोत यांना संपूर्ण आपली सिंधुनगरी चॅनेल समूह व संचालक मंडळ यांच्या तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचे जीवन हे नेहमीच “ध्यास हा जीवाला…” आहे व ते तसेच सकारात्मक राहो या सदिच्छा.
आपली सिंधुनगरी चॅनेल समूह.