कणकवली |गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्ह्यातील मालवण शहरात , गेल्या आठवड्यात सजीव दया धर्म पाळून एक सजग नागरिक श्री. आशिष परुळेकर यांनी अ.शि.दे. टोपीवाला हायस्कूल परिसरात आढळलेल्या एका दुर्मिळ द.आफ्रिकन जखमी पक्ष्याला जीवदान देण्यासाठी पर्यावरण तज्ञ व जैवविविधता तज्ञ प्राध्यापक हसन खान व वनरक्षक धामापूर यांच्यामार्फत मालवण पशुधन विकास अधिकारी डॉ. दळवी यांच्याकडे नेऊन तपासणी करुन जीवदान दिले होते. डाॅ. दळवी यांनी त्या पक्षाला देखरेखी खाली ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे त्या पक्ष्यावर उपवनसंरक्षक सावंतवाडी वनक्षेत्रपाल कुडाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मालवण यांच्या देखरेखी खाली डॉ. दळवी यांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू करण्यात आले होते. तो पक्षी हा उष्ण कटिबंधातील स्थलांतरित पक्षी होता व त्याला व्हाईट ‘टेलड् ट्राॅपिकल सीबर्ड’ म्हणतात. त्याच्या पायावर रिंग बसवण्यात आली असून त्यावर केपटाऊन व ५ एच ६७५२९ असा नंबर लिहिलेला होता. दुर्दैवाने २८ जूनला त्या पक्षाचा उपचारादरम्यान अंत झाला.
पशुधन विकास अधिकारी मालवण यांचे मार्फत शव विच्छेदन करण्यात आले. या पक्ष्याच्या मृत्यू ‘व्हाईट बेसिलरी डायरिया’ मुळे अंगातील पाणी कमी होऊन ( निर्जलीकरण ) झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
प्राध्यापक हसन ख़ान यांनी किनारपट्टीवरील तालुक्यांमध्ये दुर्मिळ तथा स्थलांतरीत पक्ष्यांसाठी व प्राण्यांसाठी सुसज्ज अशी वन्यजीव चिकित्सा व उपचार केंद्रे उभारली जावीत असा आग्रह यापूर्वीच धरला आहे जेणे करुन जखमी पशू पक्ष्यांचे उपचार तत्काळ केले जातील.