बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या मडुरा येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडियम प्रशालेत आषाढी एकादशी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेषात काढलेली वारकरी दिंडी लक्षवेधी ठरली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका नीती साळगांवकर यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्व सांगून मार्गदर्शन केले.
यानिमित्ताने प्रशालेत दीपप्रज्वलन करून श्री विठ्ठलाची पूजा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध अभंग व गजर म्हटले. टाळ गजरांच्या घोषात प्रशालेपासून मडुरा तिठ्यापर्यंत दिंडी काढण्यात आली. टाळ – चिपळ्यांचा गजर, मुखी विठ्ठलाचे नाम यामुळे वातावरण चैतन्यमय झाले होते. दिंडीमध्ये नर्सरी ते चौथी दरम्यानचे विद्यार्थी सहभागी झाले होते. मुलांसमवेत प्रशालेच्या मुख्याध्यापिका नीती साळगांवकर, सहशिक्षिका वेलांकनी रॉड्रिग्ज, प्राची परब, तेजस्वी गावडे व पालक सहभागी झाले होते.