मालवण | सुयोग पंडित : सहकारी बॅन्किंग क्षेत्रात आघाडीचे नांव असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅन्केचा उद्या ४० वा वर्धापन दिन सोहळा ओरोस सिंधुनगरी येथे संपन्न होत आहे. बँकिंग क्षेत्रातील ग्राहक सेवेच्या सर्व अद्ययावत सुविधा लाखो ग्राहकांना द्यायचा अथक प्रयत्न सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करत आलेली आहे. स्पर्धेच्या युगात शेतकरी वर्गाला केंद्रबिंदू मानून अनेक योजना,सवलतीच्या दरात कर्जे,शेती पुरक व्यवसायासाठी मदत देण्यात सिंधुदुर्ग जिल्हा बँक महाराष्ट्रात अव्वल स्थानी आहे.
बँकेचा ४०वा वर्धापन दिन उद्या शनिवारी १जुलै २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता शरद कृषी भवन, ओरोस-सिंधुदुर्गनगरी येथे संपन्न होत असून या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून आमदार श्री.प्रवीण दरेकर (अध्यक्ष -मुंबई जिल्हा.म.सहकारी बँक लि.), प्रमुख पाहुणे म्हणून आमदार जयंत पाटील (अध्यक्ष- रायगड जिल्हा म. सह. बँक लि.), राजेंद्र पाटील (अध्यक्ष- ठाणे जिल्हा म. सह.बँक लि. ), दिलीप दिघे (व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सह. बँक लि.मुंबई) अशी सहकारी बॅन्किंग क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वे सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे व बँकेचे सर्व संचालक मंडळ यांनी या सोहळ्याला सिंधुदुर्ग जिल्हा वासियांना व बॅन्केच्या ग्राहकांना विशेष निमंत्रित केले आहे.