सुयोग पंडित | क्रिडा विशेष : आपल्या शेजारील पाकिस्तान या महान देशात सर्व दुर्घटना, आपत्ती व अपयश यासाठी त्यांच्या कुठल्याही सरकारचे एक ठरलेले कारण तथा वाक्य असते ते म्हणजे,” यह पड़ोसी मुल्क़ भारत की साज़िश है…!” म्हणजे त्यांच्याकडे भूकंप किंवा महापूर जरी आले तरी ते भारताला जबाबदार अर्थात.. नव्हे ते त्यांचे पालुपदच आहे आणि गेली ७ दशके ते निष्ठेने त्यांच्या पालुपदानेच ते जगाची व स्वतःच्या जनतेची फसवणूक करत आलेत हे सूज्ञ जाणतातच.
तसाच काहीसा एक ट्रेंड सध्या भारतीय क्रिकेट बद्दल प्रचलीत व्हायला सुरवात झाली आहे. तो ट्रेंड असा आहे की भारत गेली १० वर्षे कोणताही आयसीसी किताब़ जिंकू शकलेला नाही कारण आयपिएल…..! आता या एकाच वाक्यात दोन स्वतंत्र वाक्ये आहेत ती नीट जाणली जात नाहीत म्हणून वरील गोष्टीला ‘ट्रेंड’ म्हणावे लागते आहे अन्यथा अभ्यासू विचार म्हणले जाणे उचित् ठरेल. मुळात आयसीसीच्या ज्या स्पर्धा किंवा विश्व कसोटी विजेतेपदासारखा सामना हा जरी वेळापत्रकानुसार सगळे जण वर्षभर आधी जाणत असले तरिही त्या सामन्यांत कोणते २ देश खेळणार हे तेंव्हा निश्चित नसते त्यामुळे आयपिएल चा थेट परिणाम कुठल्याही आंतरराष्ट्रीय भारतीय खेळाडूच्या खेळावर ‘होतोच’ असे म्हणणे योग्यच आहे असे गृहीत धरुन चालणार नाही. दुसरा मुद्दा अगदी नुकत्याच संपलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचा झालेला पराभव हा जर आयपिएल मुळे झालाय असे गृहीत धरले तर त्या सामन्यांत परिणामकारक कामगिरी केलेले अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकूर, रविंद्र जाडेजा आणि दुसर्या डावात काही प्रमाणात चमकदार कामगिरी केलेले रोहीत शर्मा व विराट कोहली हे सगळे आयपिएल मध्येही खेळले, बर्यापैकी चमकदार होते आणि ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातही ‘बरे’ खेळले…उत्कृष्ट नाही हे मान्य..! पण या कसोटी सामन्यासाठी चेतेश्वर पुजारा सारखा अस्सल कसोटीपटू आधिच इंगलंडमध्ये जाऊन सराव करत होता त्याला मात्र या सामन्यात छाप पाडता आली नाही. आता तो आयपिएल मध्येही नव्हता…मग असे का..? यावरुन पुजारा ‘टाकाऊ’ आहे असे ठरवणे ही सुद्धा अतिशय भंपक विचारसरणी ठरेल. मुळात कसोटी सामन्यांचा अंतिम सामना ही गोष्टच तत्कालीन आय.सी.सी.क्रिकेटींग सल्लागार समितीला म्हणजे ज्यात कुंबळे, सचिन, लक्ष्मण होते त्यांना एकमताने मान्य नव्हती. म्हणजे ती गोष्ट मंजूर नसून २ वर्षांच्या कामगिरीच्या निकषावरील ‘सर्वोत्तम २ संघ’ असा ढ़ाचा हा कृत्रीम आहे. विविध देश…वातावरण…पावसाने वाया गेलेले सामने असे अनेक घटक ‘एक स्पर्धा विजेता’ ठरवू शकत नाहीत आणि जर ठरवायचंच असेल तर आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप ही कमीत कमी ३ सामन्यांची म्हणजे ‘बेस्ट ऑफ थ्री’ खेळवली गेली तरच तिला आपण चॅम्पियनशिप म्हणू शकतो कारण ही ‘कसोटी’ असते ज्यात खेळाडू, पंच , प्रेक्षक व सर्वांचीच कसोटी लागते.
जगातील सर्वात ‘अनिश्चित खेळ’ म्हणजे क्रिकेट आहे. इथे नुसती ताकद, नुसती बुद्धी, नुसते चातुर्य किंवा नुसती प्रतिभा असून चालत नसते तर वरील सर्व गुण त्या त्या दिवशी किंवा त्या त्या सामन्यांत एकत्रित करुन त्यांचा परिपाक म्हणजे विजय मिळवणे असते. एखाद्या सामन्यात एखाद्या संघाचे तसे होत नाही किंवा होते ते त्या त्या सामन्यावर अवलंबून आहे. जे तज्ञ व सूज्ञ एका पराभवामुळे भारतीय कसोटी क्रिकेटला सध्या अपयशी ठरवत आहेत त्यांच्यासाठी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका,इंगलंड व न्यूझीलंडचे खेळाडू निष्ठावंत आहेत आणि ते खरेच आहे परंतु त्याचा अर्थ आयपिएल खेळणारा भारतीय कसोटी खेळाडू हा निष्ठावान नसतो असा गृहीत धरणे संपूर्ण अयोग्य. द.आफ्रिकेने त्यांची शेवटची आय.सी.सी. स्पर्धा १९९८ मध्ये जिंकली होती. त्या मानाने भारताचा विचार केला तर भारत विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या दोन्ही अंतिम सामन्यांत पोहोचलाय ही गोष्ट आपण सहज दुर्लक्षित करतो. त्याही पूर्वी जेंव्हा विश्व कसोटी चॅम्पियनशिप नव्हती तेंव्हा गुणांच्या आधारे ती कसोटीच्या ‘मानाची गदा’ भारताने ३ वेळा स्वतःकडे राखलेली होती आणि तेंव्हाही आयपिएल सुरु होतीच..!
प्रश्न आर्थिक समीकरणांचा असेल तर कसोटी खेळणार्या किंवा बिसीसीआयच्या वार्षिक करारात असलेल्या कोणत्याही खेळाडूला निव्वळ पैसा कमवायचाय म्हणून आयपिएल खेळावे असे वाटण्याजोगी भारतीय कसोटी क्रिकेटपटूंची विंडिज, लंका, पाक किंवा झिंबाब्वे सारखी नाही आहे. प्रत्येक खेळाडू स्वतःला थोडा अधिक तंदुरुस्त करणे, कमी दबावाचे चुरशीचे सामने खेळणे यासाठी ‘चेंज’ म्हणूनही आयपिएल खेळत असतो किंवा त्यांच्या अनुभवांचा थेट मैदानात असण्याचा फायदा उदयोन्मुख खेळाडूंना घडू शकतो हे महत्वाचे आहे. १९९७ साली वर्ल्ड टेलच्या मार्क मस्कारन्हस यांनी सचिन तेंडुलकर यांच्याशी १०० कोटींचा करार केलेला तेंव्हाही अनेकांनी ‘सचिन आता संपणार’ अशी बोंब मारली होती आणि त्यानंतर तब्बल १५ वर्षे सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळले….१०० आंतरराष्ट्रीय शतके झळकावली …!
एखाद्या सामान्य कसोटी सामन्याप्रमाणेच ओव्हलवरील तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होता आणि तो सामना भारत अत्यंत वाईटरित्या हरला हे मान्य परंतु त्याचे बिल आयपिएल वर फाडणे हा ट्रेंड नक्कीच नकारात्मक आहे. आज भारतातील कोणत्याही मैदानावर सराव सुरु असेल तर तिथे जाऊन कुठल्याही लहान मुलगा किंवा मुलगी खेळाडूला विचारा की तुम्हाला ‘कसोटी खेळायची आहे की आयपिएल?’ …उत्तर ‘कसोटी’ असेच येईल..! परंतु सर्वजण ती खेळू शकत नसतील तर निदान अर्थार्जन किंवा सरावाच्या अत्याधुनिक सुविधांच्या खर्चासाठी आयपिएल पोषक ठरत असेल तर ते एक इंधन भरायचे केंद्र समजावे. आणि या आयपिएल मध्ये जर अनुभवी भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळले नाहीत तर त्याकडे प्रेक्षकांच प्रतिसाद मिळेलच याची खात्री नाही म्हणून त्यांनी खेळले तर नवोदितांचे काही आर्थिक प्रश्न सुटू शकतात.
भारतीय कसोटी संघाच्या पराभवाची जरुर कारण मिमांसा व्हावी. पराभवाला जबाबदार घटक व खेळाडुंच्या ‘त्या’ सामन्यातील खेळाबद्दल निर्णय प्रकिया व्हावी, एक दोन खेळाडूंना देव बनवून ठेवू नये, प्रसंगी कठोर निर्णय घ्यावेत हे सगळं भारतीय कसोटी क्रिकेटसाठी अत्यावश्यक आहेच परंतु त्याचे ‘बिल आयपिएल वर फाडून ‘ निव्वळ निराश होणे किंवा निषेध करणे हे सुद्धा ‘निषेधार्ह’ आहे.
आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल