कुवळे गावचे सरपंच सुभाष कदम यांनी ठेकेदाराच्या कामाबद्दल व्यक्त केला संताप..!
संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
कणकवलीतून काल सकाळी ७ वाजता सुटलेली कणकवली- शिरगांव ही एस टी बस कुवळे परबवाडी येथील ‘काजराचा व्हाळ’ येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या भरावात कलंडल्याने अपघात होता होता वाचला. ही घटना काल शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली.
या पुलाचे काम फेब्रुवारी महिन्या पासून सुरू असून सध्या दोन्ही बाजूच्या भरावाचे काम सुरू आहेत या भरावात पाणी मारून रोलर फिरवीत नसून मातीचाच भराव करत आहेत. त्यामुळे या मातीच्या भरावात एसटी बसचे चाक मातीत रुतून बस कलंडली माञ चालकाच्या प्रसंगावधाने मोठा अनर्थ टळला. या बसमधून १२ प्रवासी प्रवास करत होते.
यावेळी कुवळे गावचे सरपंच सुभाष कदम यांनी या कामाबद्दल संताप आणि तीव्र नाराजी व्यक्त केली. ठेकेदाराच्या कामातील दिरंगाई, हलगर्जीपणामुळे हा प्रसंग घडला असे त्यानी सांगितले. यावेळी कुवळे गावचे उपसरपंच प्रदोष प्रभुदेसाई, माजी सरपंच महेंद्र परब, ग्रामपंचायत सदस्य सुभाष थोरबोले, रत्नदीप कुवळेकर, भाजपा बुथ अध्यक्ष अजित घाडी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या सर्वांनी वाहतूक पूर्ववत होण्यासाठी सहकार्य केले. मात्र या घटनेदरम्यान बस रस्त्यावर मध्येच अडकल्याने या मार्गावरील वाहतूक तब्बल ४ तास ठप्प होती.