आपली सिंधुनगरी डेस्क | ब्युरो न्यूज : प्रेमी युगुलांच्या आत्महत्या व खोट्या प्रतिष्ठेपायीच्या हत्या यांचे प्रमाण संपूर्ण देशभरात व विशेष करुन उत्तर भारतात गेली ३ वर्षे पूर्वीच्या सरासरीपेक्षा कमी झाले आहे तरिही काही घटना समोर येत आहेत. काल गुरुवारी सकाळी राजस्थान मधील बाडमेर मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे व तिच्यामुळे खळबळ माजली आहे . राजस्थानच्या बाडमेरमध्ये कुटुंबीयांना त्या दोघांचे प्रेम मंजूर नव्हते. ते दोघे त्यांच्या प्रेमावर ठाम होते पण घरच्यांचा विरोध सहन करुन विवाह करु शकत नव्हते . त्यातच तिचे लग्न ठरले आणि त्यामुळे दोघांची तगमग झाली. मग बुधवारी रात्री दोघेही घराबाहेर पडले. बराच वेळ एकत्र घालवला. एकमेकांशी मनमोकळा संवाद साधला पुन्हा पुढच्या जन्मी भेटण्याच्या आणाभाका घेतल्या. सेल्फी फोटोग्राफ काढला. व्हॉट्स अपवर स्टेट्स ठेवला. शेवटचा क्षण मनसोक्त जगलो आहोत असेही त्यात नमूद केले. गुरुवार सकाळ उजाडली तेंव्हा सर्व काही संपले होते. तिचा श्वास थांबलेला होता. त्याचाही श्वास बंद होता. दोघांनीही जगाचा निरोप घेतला होता. फक्त उरल्या होत्या दोघांच्या फोन मध्ये चित्रीत झालेल्या शेवटच्या आठवणी व घरच्यांना नमस्काराचा शेवटचा संदेश…!
नरेश कुमार यांची १९ वर्षाची मुलगी खुशी आणि बाबूलाल यांचा २१ वर्षांचा मुलगा ओमप्रकाश या दोघांची ही प्रेम कहाणी. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. दोघांनीही लग्न करायचं ठरवलं होतं. सुखी संसाराची स्वप्ने पाहिली होती. काही दिवसांपूर्वी खुशीच्या आईवडिलांनी तिचे लग्न ठरवले. तिचा साखरपुडाही झाला. या घटनेमुळे दोघेही मनातून खचले. दोघांनाही एकमेकांपासून दूर राहायचं नव्हते. त्यांना हे लग्न मंजूर नव्हते. अशावेळी बुधवारी रात्री दोघेही घरातून बाहेर पडले. गावातील सरकारी शाळेत पोहोचले. या शाळेत दोघांनी बराच वेळ एकत्र घालवला. भरपूर गप्पा मारल्या. दोघांनीही प्रेमाची आठवण म्हणून सेल्फी काढला. त्यानंतर हाच सेल्फी त्यांनी व्हॉट्सअपला स्टेट्स म्हणून ठेवला. त्यानंतर दोघांनी सोबतच्या मोठ्या कापडी पिशवीचा दोर तयार केला आणि झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. इकडे दोघांच्या घरच्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली होती. दोघेही पळून गेल्याचा त्यांना संशय होता. त्यामुळे रात्रभर शोध केला. त्यानंतर पुन्हा सकाळी दोघांचा शोध घेतला. खुशीची आई तिचा शोध घेत घेत गांवच्या सरकारी शाळेजवळ आली आणि तिला शाळेच्या आवारातील झाडाला दोघांचेही मृतदेह लटकलेले दिसले. खुशीच्या आईने हंबरडाच फोडला. त्यांची रडारड ऐकून गावातील लोकही घटनास्थळी दाखल झाले. त्यातील काही जणांनी पोलिसांना फोन केला आणि पोलिसांना घटनास्थळी पाचारण केलं.
बाडमेर धोरीमन्ना पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोघांचेही मृतदेह धोरीमन्ना रुग्णालयात पाठवले. तिथे शवविच्छेदनानंतर दोघांच्याही नातेवाईकांकडे मृतदेह सोपवण्यात आले. दोघांनीही प्रेमातील नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुलीच्या आत्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे धोरीमन्ना पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी लाखाराम यांनी सांगितले. या घटनेनंतर देशातील विविध सामाजिक मंचांवर परस्परविरोधी प्रतिक्रिया येत आहेत.