आचरा | प्रसाद टोपले : मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांवठणवाडीचे आणि सध्या मुंबई पोलिस दलाच्या भायखळा येथे कार्यरत असलेले हवालदार प्रदीप साबाजी परब यांना पोलिस पदक सन्मान जाहीर झाला आहे. महाराष्ट्र पोलिस विभागातील विविध प्रवर्गात उत्कृष्ट सेवा बजावलेल्या अधिकारी व अंमलदार, हवालदार यांना हा पुरस्कार दिला जातो. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे या पोलिस सेवा पदक तथा पुरस्काराचे स्वरुप असून लवकरच तो प्रदान करण्यात येणार आहे.
साल १९९३ मध्ये पोलिस दलात रुजू झालेल्या या पळसंब गांवच्या सुपुत्राने गुणवत्तापूर्ण उल्लेखनीय कामगिरी करत सेवेत सलग ३० वर्षे सातत्यपूर्ण वाटचाल केली आहे. आपल्या गृह रक्षण दलातील अथक सेवेसोबतच त्यांनी त्यांच्या गांवातील विविध प्रगतीशील उपक्रमांसाठी तन,मन व धनाने सर्वतोपरी हातभार लावला आहे असे पळसंब गांवचे माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी त्यांच्या अभिनंदन संदेशातून सांगितले असून संपूर्ण पळसंब गांव व गांवातील लहानमोठ्या अशा एकेका व्यक्तीसाठी हा अभिमानाचा आनंद असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. संपूर्ण पळसंब गांव व ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन केले गेले आहे. श्री आई जयंती देवी त्यांच्या यापुढीलही जीवनासाठी त्यांना आशिर्वादीत करो असेही त्यांनी संपूर्ण गावाच्या वतीने सांगितले आहे.
पळसंब जि.प. शाळा संगणकीकरणात त्यांचे अतिशय मोलाचे सहकार्य असून इतरही अनेक शैक्षणिक प्रकल्पांसाठी व खासकरुन विद्यार्थी विद्यार्थिनींच्या प्रगतीसाठी नेहमीच झटत आले आहेत.