क्रीडा | सुयोग पंडित : आयपीएल २०२३ चा थरार सलग तीन दिवस अनुभवता आला. आज मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईने दिल्लीचा निसटता पराभव करून सामन्यात विजय मिळवला आहे.
मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा ६ गड्यांनी आणि अखेरच्या चेंडूवर पराभव केला. आता आयपीएल २०२३ मधील त्यांचे विजयाचे खाते उघडले आहे. दिल्ली कॅपिटल्सच होम ग्राउंड असलेल्या अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या गोलंदाजांनी देखील कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत दिल्ली विरुद्ध उत्कृष्ट गोलंदाजी केली.
दिल्ली कॅपिटल्सकडून फलंदाजीसाठी मैदानात कर्णधार डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी धडाकेबाज सुरुवात केली. पण चौथ्या षटकांत १५ धावा करून पृथ्वी शाॅ बाद झाला. दिल्लीकडून डेविड वॉर्नरने ५१, मनीष पांडेने २६, अक्षर पटेलने जलद ५४ धावांचे योगदान दिले. तर दिल्लीच्या इतर फलंदाजांना दोन अंकी धाव संख्या करता आली नाही. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांपैकी पियुष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. तर रिले मेरेडिथने २ आणि ऋतिक शौकीनने १ बळी घेतला. दिल्ली कॅपिटल्सने सर्व बाद १७२ धावा केल्या.
मुंबई इंडियन्सला विजयासाठी १७३ धावांचे आव्हान मिळाले असताना कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांची जोडी ओपनिंगसाठी मैदानात आली. यात आठव्या ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजाला ईशान किशनची विकेट घेण्यात यश आले. परंतु त्यानंतर कर्णधार रोहितने मैदानावर चौफेर फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. रोहितने आयपीएल कारकिर्दीतील त्याचे ४१ वे अर्धशतक ठोकले. त्याला तिलक वर्माने ४१ धावा करत जबरदस्त साथ दिली. पण तरी सामना शेवटपर्यंत ताणला गेला. टीम डेव्हीड व कॅमेरून ग्रीनने फटकेबाजी करत शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सला त्यांचा आयपीएल २०२३ चा पहिला विजय मिळवून दिला.
अभिनंदन मुंबई इंडियन्स