मुंबई | ब्यूरो न्यूज : अंमली पदार्थ तथा ड्रग्जच्या गुह्यातील आरोपीला पकडायला व संबंधित चौकशीसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना जोगेश्वरीच्या प्रेम नगरात घडली. आरोपी, त्याची आई व शेजारच्यांनी मिळून पोलिसांना शिवीगाळ करीत मारहाण केली. यात एक उपनिरीक्षक व दोन कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणी हल्लेखोरांविरोधात मेघकाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी रिज़वान पळून गेला. ही धक्कादायक घटना शनिवारी घडली.
७ एप्रिलला एनडीपीएसचा एक गुन्हा दाखल झाला आहे. त्या गुह्यातील आरोपी रिज़वान हा जोगेश्वरीच्या प्रेम नगर परिसरात राहत असल्याचे समजल्याने त्याला पकडण्यासाठी आझाद मैदान युनीटचे उपनिरीक्षक शंकर पवळे, भालेराव, आवळे तसेच चव्हाण, नाईक, भोसले, सिंग, राठोड व महिला अंमलदार शिखरे असे पथक शनिवारी रात्री प्रेम नगरात गेले होते. त्या वेळी रिज़वान तेथील आर.एस. कलेक्शन या दुकानाच्या बाजूच्या गल्लीतून आत जाताना दिसला. पथकाने लगेच त्याच्या पाठी जाऊन त्याला एका घरासमोरील बोळात उभा असताना त्याला रोखले. पथकाने त्याला पोलीस असल्याचे सांगून आपले ओळखपत्र दाखवले. रिज़वानने लगेच पोलीस पकडायला आल्याची ओरड घालायला सुरूवात केली. तेंव्हा घराच्या पोटमाळ्यावर असलेल्या रिज़वानच्या आईने खाली येऊन पोलिस पथकाला शिवीगाळ करायला सुरूवात केली. त्यानंतर अन्य चार महिला घरातून खाली आल्या आणि त्यांनीही पोलिसांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. तसेच त्यातील एका महिलेने उपनिरीक्षक आवळे यांच्या हाताचा चावा घेतला व अन्य लोकांनी मारहाण केल्याने त्यात आवळे यांच्या हाताला व पायाला दुखापत झाली. तसेच महिला अंमलदारासह दोघे कर्मचारी जखमी झाले. त्याचा फायदा घेत रिज़वानने पळ काढला आणि त्याच गल्लीतील कोपऱ्यातल्या एका खोलीच्या माळ्यावर चढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केल्याकर अन्य तिघांनी पोलिसांना पकडून ठेवले. पोलिसांनी समजविण्याचा प्रयत्न करूनही त्या लोकांनी काहीही न ऐकता पोलिसांना दमदाटी, शिवीगाळ व धक्काबुक्की करणे सुरूच ठेकले. यात एक पोलीस अधिकारी व दोघे कर्मचारी जखमी झाले. अखेर त्या हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका करत पोलिसांनी मेघवाडी पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी मेघवाडी पोलीस ठाण्यात रिज़वान, त्याची आई तसेच अन्य हल्लेखोर ४ महिला, ३ पुरूषां विरोधात मेघवाडी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले गेले आहेत.