आय.पि.एल.च्या उद्घाटनाच्या सामन्यांतील मध्यंतरात सादर झालेला ‘रिंग ऑफ फायर’ लेझर शो ठरला आशियाई क्रिडा क्षेत्रातील सर्वात मोठा लाईव्ह ‘दूरचित्रवाणी लेझर शो..!’
मालवण | सुयोग पंडित ( क्रिडा वृत्त ) : बहुप्रतिक्षीत आय.पी.एल.२०२३ स्पर्धेला काल ३१ मार्चला अहमदाबाद मधील श्री.नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर शानदार सुरवात झाली. पहिला सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स विरुद्ध चार वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्जदरम्यान रंगला. चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक गमावली आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. सलामीवीर ॠतुराज गायकवाडने तब्बल ९ षटकारांसह ९२ धावा केल्या.
गुजरात टायटन्स तर्फे राशिद ख़ानने किफायतशीर गोलंदाजी करत २ बळी मिळवले. चेन्नईच्या कर्णधार महेंद्र सिंग धोनीने १ षटकार व १ चौकार ठोकून संघाला १७८ धावांपर्यंत पोचवले.
१७९ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या गुजरात टायटन्सच्या सलामीच्या वृद्धीमान सहा व शुभमन गीलने केवळ ४ षटकांत संघाला अर्धशतकी सलामी दिली. नंतर थोडी पडझड झाली तरी विजय शंकर व शुभमन गीलने संघाला विजया समीप पोचवले. या सामन्यात प्रथमच ‘इंपॅक्ट प्लेअर’ ही संकल्पना अंमलात आणली गेली. चेन्नई तर्फे तुषार देशपांडे तर गुजरात तर्फे साई सुदर्शन हे इंपॅक्ट तथा राखीव खेळाडू संघात उतरले.
साई सुंदर्शनने अतिशय प्रभावी फलंदाजी करुन २७ धावाही जोडल्या परंतु तुषार देशपांडे हा चेन्नईसाठी भयंकर महागडा ठरला. गुजरात टायटन्सने ४ चेंडू बाकी असताना हा अटीतटीचा सामना खिशात टाकला.
या सामन्याच्या मधयंतरातील लेझर शो हा आशियाई क्रीडा क्षेत्रातील लाईव्ह पाहिला गेलेला सर्वात मोठा मनोरंजक इव्हेंट म्हणून नोंदवला गेला.