मालवण | सुयोग पंडित : २०२३ आणि २०२४ ही वर्षे ‘अल निनो’ची असू शकतात, असा अंदाज हवामानतज्ञांनी तसेच भौगोलिक अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. हे जर खरे ठरले तर राज्यावर पाण्याचे मोठे संकट येऊ शकते. त्यामुळे यासंदर्भात मुख्य सचिवांसोबत नुकतीच बैठक घेण्यात आली आहे.
तलावांतील पाणीसाठा तपासून त्यानुसार जलसंधारणावर भर देण्यासाठी आतापासूनच प्रयत्न केले जात आहेत. तसेच संरक्षित सिंचनासाठी जलयुक्त शिवार टप्पा २ आणि जलसंधारणाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शुक्रवारी विधान परिषदेत दिली.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेनंतर राज्यपालांच्या आभाराचा ठराव मांडताना फडणवीस म्हणाले, की शासनाने मागील आठ महिन्यांच्या काळात जनहिताचे विविध निर्णय घेतले. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने ७ हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. ६५ मिमी पावसाची मर्यादा न ठेवता सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात मदत देण्याचा निर्णयदेखील शासनाने घेतला आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या (एनडीआरएफ) निकषांपेक्षा दुप्पट मदत देण्यात आली आहे. सन २०२५ पर्यंत ३० टक्के फीडर सौर ऊर्जेवर आणणार असल्याने शेतकऱ्यांना दिवसा वीज देता येईल.