ब्यूरो चिफ/ विवेक परब: आचरा काझीवाडी येथील एस. के. काझी वाचनालयाचे कार्याध्यक्ष आणि टोपीवाला हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक रियाजुद्धीन महंमद अली काझी (वय-८२) यांचे काल सायंकाळी निधन झाले.
येथील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल मध्ये १९६८ साली त्यांनी शिक्षक म्हणून सेवा सुरू केली. हिंदी, इंग्रजी, शारीरिक शिक्षण, स्काऊट हे विषय ते शिकवीत असत. कडक शिस्तीचे तसेच विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांना ओळखले जायचे.
१९९९ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतरच्या काळात त्यांनी मालवण एज्युकेशन सोसायटीचे ट्रेझरर म्हणूनही काम पाहिले. सेवानिवृत्ती नंतर ते आचरा येथे आपल्या मूळ घरी वास्तव्यास होते. आचरा येथे एस. के. काझी वाचनालयाचे कार्याध्यक्ष म्हणून ते काम पाहत होते. धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कूल आचरा स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले होते.
आचरा गावचे प्रतिष्ठित नागरिक तसेच गावातील सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असायचे. त्यांची प्रकृती खालावल्याने शहरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.