राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ पथकाने इन्सुली तपासणी नाक्यावर केली कारवाई.
बांदा | राकेश परब : गोवा बनावटीच्या दारुची गोवा ते मुंबई दरम्यान बेकायदा वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ पथकाने कारवाई केली. यात तब्बल गोवा बनावटीच्या दारुच्या १ लाख ४४ हजार दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या जप्त करण्यात आलेल्या १ कोटी ८७ लाख २० हजार रुपयांची दारू तर २५ लाखांचा कंटेनर व इतर मुद्देमाल १२ हजार असा एकुण २ कोटी १२ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक होणार असल्याची खात्री लायक माहिती कुडाळ पथकाला होती. त्यानुसार गेले काही दिवस त्या वाहनावर करडी नजर ठेवून होते. मिळालेल्या माहिती नुसार शुक्रवारी सायंकाळी इन्सुली तपासणी नाका येथे वाहन आले असता तपासणी साठी थांबविले. एमएच १२ एलटी ७६१७ गाडीची तपासणी केले असता त्यात मोठ्या प्रमाणात दारू साठा असल्याचे उघड झाले.
या कारवाईमध्ये संशयित राजशेखर सोमशेखर परगी ( ४१, रा. हुबळी जि.धारवाड), रहमतुल्लाह कासीम खान (४१, रा. कारवार) यांना वाहनासह ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमित पाडळकर यांनी केली. या कारवाईमध्ये निरीक्षक संजय मोहिते, दुय्यम निरीक्षक राहूल मोरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक रमाकांत ठाकूर, जवान वाहनचालक एच. आर. वस्त, जवान शरद साळुंखे, वाहनचालक संदीप कदम यांनी केली. पुढील तपास निरीक्षक अमित पाडळकर करीत आहेत.