सिंधुदुर्ग जिल्ह्यासहीत जगभरातील ‘श्री सद्गुरु दास्य भक्ती ‘ उपासकांमध्ये चैतन्य आनंदाची लहर.
श्री सद्गुरु क्षेत्र रेवदांडा येथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली श्री सद्गुरु आप्पासाहेब धर्माधिकारी स्वारींची भेट.
मालवण | सुयोग पंडित : श्रेष्ठ निरुपणकार पद्मश्री श्री आप्पासाहेब धर्माधिकारी ( श्री सद्गुरु स्वारी) यांना साल २०२२ साठीचा महाराष्ट्र राज्य सरकारचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सद्गुरु श्री आप्पासाहेब स्वारींची भेटही घेतली.
पद्मश्री डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेली ३५ वर्षे निरुपणाद्वारे जगातील सर्वसामान्यांना अध्यात्मिक भक्तीचा, सामाजीक भानाचा आणि प्रापंचिक कर्तव्याचा मार्ग दाखवत आहेत. ‘उपासनेला दृढ़ चाल व्हावे’ हे समजावताना त्यांनी जगाला पर्यावरण,आरोग्य,उद्योग, चोख व्यवहार, प्रामाणिक व्यवसाय, शिक्षण, स्वच्छता, जल संधारण, वृक्ष लागवड व संवर्धन या व इतर अनेक स्तरावर कार्य केले आहे व ते अथक चालू आहे.
अंध आणि दांभिक श्रध्दा निर्मूलन , बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे कार्यही केले. समाजातील जाती,धर्म या भेदभावांनाही परखडपणे आणि सहजतेने दूर सारुन अवघा समाज ‘मनुष्य जाणीवेचा’ आहे याची जाणीव करुन देण्याचे अथक कार्यही त्यांनी सुरु ठेवलेलेच आहे.
महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केले.
डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. अलीकडच्या काळात संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले. त्याशिवाय वृक्षसंवर्धन,तलाव व स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे आयोजनही नियमितरीत्या करण्यात येते. गणेशोत्सव व नवरात्रौत्सवनंतर निर्माल्यातून खतनिर्मिती करून एक पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी हे स्वच्छतादूत म्हणूनही ओळखले जातात
या संपूर्ण अथक समाज कार्याची ज्योत त्यांचे वडिल तथा डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी ( श्री सद्गुरु मोठी स्वारी) ह्यांनी १९४३ सालापासून केली होती आणि आज ते कार्य, प्रचंड जोमाने, तत्परतेने, सजगतेने जगभर पोहोचविण्याचे कार्य पद्मश्री श्री आप्पासाहेब धर्माधिकारी (श्री सद्गुरु स्वारी ) करत आहेत.
पद्मश्री श्री आप्पासाहेब धर्माधिकारी (श्री सद्गुरु स्वारी) यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याची वार्ता समजताच सिंधुदुर्ग जिल्ह्यासहीत जगभरातील ‘श्री सद्गुरु दास्य भक्ती’ उपासकांमध्ये चैतन्य आनंदाची लहर आली आहे.