युवा परिवर्तन केंद्र कुडाळच्या सहकार्याने मार्गदर्शन शिबीर संपन्न.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बांदिवडे ग्रामपंचायत व युवा परिवर्तन केंद्र, कुडाळचा संयुक्त उपक्रम असणारे व्यवसाय तथा स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर काल ६ फेब्रुवारीला बांदिवडे केंद्र शाळा क्र.१ येथे संपन्न झाले. या शिबिरात युवा वर्ग आणि बचत समूहातील महिलांची उपस्थिती होती.
बांदिवडे ग्रामपंचायतच्या नवीन ग्रामपंचायत सदस्यांच्या कार्यकारिणीने आखलेला हा पहिलाच ग्रामव्यापक उपक्रम होता. सरपंच आशू मयेकर, उपसरपंच पुष्पक घाडी ग्रामपंचायत सदस्य नारायण परब आणि इतर सहकारी कार्यकारिणीने युवा परिवर्तन केंद्र कुडाळच्या माध्यमातून हा उपक्रम निश्चित केला होता.
या उपक्रमाबद्दल माध्यमांना माहिती देताना सरपंच आशू मयेकर, उपसरपंच पुष्पक घाडी व ग्रामपंचायत सदस्य नारायण परब यांनी ग्रामपंचायतच्या वतीने स्पष्ट केले की या शिबिराचा साधारण ३० ते ३५ प्रशिक्षणार्थी लाभ घेऊन उपस्थित राहतील असा अंदाज असताना तब्बल ७० जणांनी तिथे उपस्थिती दर्शवली. यामुळे गावासाठी आणखीन दुप्पट ताकदीने काम करायचे बळ आपल्याला लाभले आहे. युवा परिवर्तन कुडाळच्या मार्गदर्शक टीमचेही त्यांनी आभार मानले. गावातील जनतेचा आपल्या नवीन ग्रामपंचायत सदस्यांच्या कार्यकारिणीवरचा विश्वास किती मजबूत आहे ते या शिबिरातून समजले असल्याचाही निर्वाळा त्यांनी दिला. गावातील आबालवृद्ध, युवक, महिला, होतकरू, गरजू आणि पिडितांसाठी आपण आता अधिकाधिक प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन उपस्थित ग्रामपंचायत कार्यकारिणीने केले.