आंगणेवाडी जत्रा, या विषयावर लिहीणं म्हणजे पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या आंगणेवाडीच्या जत्रेच्या आठवणींचा एक विलक्षण खेळ.. जत्रेतल्या त्या पाळण्यासारखा उंचच उच आभाळाला भिडणारा. रिंगाच्या खेळात अडकलेल्या वस्तुसारखं मन आठवणीच्या रिंगात अडकून पडते. मागे कुणीही नसताना कुणीतरी त्या गर्दीत तुम्हाला ओढत राहते आणि याच भक्ती आणि अनाम शक्तीच्या आवेगाचं नाव असतं, आंगणेवाडी जत्रा…
आंगणेवाडी.. लौकीक दृष्ट्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक छोटेखानी गावं. महाराष्ट्राची दक्षिण काशी अशी आम्ही कोकणवासीयानी सर्वदूर पसरवलेलं शक्तीपीठ. आंगणेवाडीची यात्रा ही खरतर फक्त आंगणे कुटुंबियाची असते, पण या देवीवर महाराष्ट्रासह देशभरातल्या कोट्यवधी भक्तांचा विश्वास बसलाय कि आता हेच आमचं कुलदैवत !
आंगणेवाडीची यात्रा प्रत्येकाच्या आठवणीत असते. आणि त्याच व्याजावर वर्षभर जगण्याचा सोस कमी करायचा आणि पुन्हा नव्यानं नव्या जत्रेच्या आठवणीचं मुद्दल काळजाच्या बॅंकेत जमा करायचं अशी ही दसादशे नफ्याची यात्रा असते.. आपल्या आईबापाच्या हाताला पकडून जाणा-या चिमुरड्याला पाळण्यात बसायचा मोह असायचा, आज तेच पोरगं बाप झाल्यावर त्याच्या चिमुरड्या लेकरासाठी, पाळणे, मौत का कुवा, गोल गोल गाडी, टॉय ट्रेन म्हणजे एम्युझमेंट पार्क व्हीझीट होऊन जातेय.. दरवर्षी गर्दी वाढत जातेय..
या प्रत्येकाला देवीची जत्रा तुम्ही स्वताहून इतरांना कळवा असं कुणी कुणालाच सांगत नसायचा.पण प्रत्येकजण करायचा कारण प्रत्येकाची जत्रा प्रत्येक भाविकांपर्यत पोहचली पाहीजे अशी मनपुर्वक श्रद्धा असायची. आणि याच श्रद्धेतून गावातल्या पोस्ट ऑफिसातून म्हाता-या आवशीचो मुंबयच्या चाळीत तलाच्या बाजुला नलाच्या खोलीच्या आंगाला रवना-या झिलाक फोन जायचा, मुलाचा रिप्लाय असायचा की नेमक्या त्याच तारखेला काहीतरी ऑफीसचं काम असायचं तो यंदा येऊ शकणार नाही. खर तर त्या माऊलीला त्या नकाराची अपेक्षाच नसायची. पुढं तो पोरगा बोलायचा आवशी तूच जा आनी देवीक माजो नमस्कार सांग. त्याचवेळी एवढा वेळ शांत असणारी ती माऊली ती ओरडायची, चुलीत गेली नोकरी, शिग्रेट फॅक्टरीजवळ सामान घेवन यायचा आनी रातरानीन गप्प सुनेक आनी नातवाक घेवन गावाक ये.. नोकरी गेली तरी चल्लात दुसरी गावात.. अरे तू जत्रेक ये , छप्पन नोकरीचे कॉल येतले.. माझी देवी खमकी हा..
हा सगळा प्रसंग कित्येक चाकरमान्यांच्या आय़ुष्यात शब्दश: घडला असेल.. भरपगाराची नोकरी एका जत्रेसाठी बिनदिक्कत सोडून देण्याची भाषा करणारी माऊली सिंधुदुर्गाच्या खेड्यापाड्यात आज वेगवेगळ्या नावानी चाकरमान्याची आये म्हणून मिरवतत… हा सगळा श्रद्धेचा आणि अनाम उर्जेचा स्त्रोत आहे.. जत्रा सुरु होऊन कित्येक वर्ष झाली असतील पण आजही त्याच उत्साहानं आणि तेवढ्याच भक्ती कल्लोळात आंगणेवाडीचीही जत्रा लक्षावधी भाविकांना एकाच दिवशी भेटावयास बोलवते.
भाविकांच्या प्रेमानं मंदिराचं रुपडं बदलतय. आज अनेक जण विचारतात देवीचा फोटो का काढत नाही. याच उत्तर प्रथा परंपरेत असेल पण माझी वैयक्तित श्रद्धा आहे कि या देवळात येऊन तुम्ही भराडीदेवीचा चेहरा एकदा पाहिला ना कि तो तुमच्या काळजातल्या गाभा-यात घट्ट प्रतिस्थापीत होतो. आणि ज्या काळजात देवी वसते ना त्या दैवताचे फोटो, चित्रिकरण अशा गोष्टींसाठी मन आसूसलेलं नसतच मुळी.. आणि म्हणून मिटल्या डोळ्यासमोर आईचे या मातीतली रुप लोकदैवत म्हणून उभं राहते आणि भवानी अष्टकाच्याच ओळी तुम्हाला संजीवन बनवतात…’गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भराडी.’
(लेखन – ऋषी देसाई, वृत्तनिवेदक, मालवण, ९८७०९०४१२९)
(फोटो सौजन्य : सिद्धेश चव्हाण , मालवण)