टोपीवाला स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून स्पर्धेचे आयोजन.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या सुप्रसिद्ध टोपीवाला बोर्डिंग ग्राऊंड वर उद्या २ फेब्रुवारीपासून १४ वर्षां खालील मुलांच्या क्रिकेट प्रतिभेला प्रोत्साहन आणि सक्षम टर्फ खेळपट्टी सहीत मैदान देण्याच्या उद्देशाने टोपीवाला स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा कै. श्री. विलास बांदिवडेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित केली जात आहॆ. श्री.विलास बांदिवडेकर हे मालवणचे सुपुत्र व भारतीय क्रिकेट बोर्डाचे वरिष्ठ पंच होते.
अनेक रणजी आणि आय. पी. एल च्या सामन्यात त्यांनी पंच म्हणून कामगिरी पार पाडली होती. कोरोना काळात ते कालवश झाले.

श्री. विलास बांदिवडेकर यांनी भारतीय आणि मालवण क्रिकेटला दिलेले योगदान हे अतुलनीय आहॆ म्हणूनच त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे असे आयोजकांनी सांगितले आहे.

या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७ तर सांगली जिल्ह्यातील एका संघाने सहभाग घेतला आहे. या स्पर्धेतील सामने पहाण्यासाठी जास्तीत जास्त क्रीडा व क्रिकेटप्रेमी,स्थानिक खेळाडू आणि सर्वांनीच उपस्थित राहून देशातील युवा प्रतिभेला प्रोत्साहन द्यावे अशीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा अभ्यासकांनी आशा व्यक्त केली आहे.