वादळीवाऱ्यात वाहनचालकांना जीव मुठीत धरून चालवावी लागतात वाहने….!
शिरगांव |संतोष साळसकर : शिरगांव – साळशी मार्गावरील ‘खांबड’ येथील भागात रस्त्याच्या दुतर्फा मार्गावरील वळणावर अतिशय जुनाट वृक्ष दोन्ही बाजूला आडवे आले आहेत.त्यामुळे पावसाळ्यात वादळी वाऱ्यात या मार्गावरून वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते.
शिरगांव-साळशी हा मार्ग कणकवली आणि मालवण दोन्ही तालुक्यांना जोडणारा सर्वात जवळचा मार्ग असल्याने या मार्गावरून असंख्य वाहने रोज ये-जा करीत असतात.या खांबड भागात उतारावर मोठंमोठी जुनाट झालेली झाडे गेली कित्येक वर्षे वाहनचालकांना अतिशय धोकादायक ठरली आहेत.याबाबत काही ग्रामस्थांनी संबंधित खात्याला वारंवार लेखी निवेदने देऊनही धोकादायक बनलेली ही झाडे अद्याप तोडली गेली नाहीत.
काही वर्षापूर्वी शिरगांव-नांदगांव मार्गावर राक्षसघाटी येथे एका खाजगी बसवर मोठे जुनाट झाड पडले होते.त्यामुळे खूप नुकसान झाले.त्याचप्रमाणे शिरगाव-साळशी मार्गावरील “खांबड”येथील ही जुनाट झाडे वाहतुकीदृष्ट्या अतिशय धोकादायक बनली असून मोठी जीवितहानी होऊ शकते.असे वाहनचालकांचे म्हणणे असून संबंधित खात्याने ही झाडे तात्काळ तोडावीत अशी जोरदार मागणी होत आहे.