मूळ पळसंब गांवची आदिती मुंबईतील ‘चिल्ड्रन्स ॲकॅडमी ऑफ स्कूल्स ‘ ची विद्यार्थिनी.
आदितीने ‘ब्रि बुकस्’ प्रकाशन मंचावर लिहिले ‘इन द टाॅक्झीक वर्ल्ड’ नांवाचे सामाजिक मनोधैर्य विषयावरील पुस्तक.
सुयोग पंडित | मुख्य संपादक : आपण ‘मूल विलक्षण’ किंवा चाईल्ड प्राॅडिजी बाबत नेहमी ऐकत आलेलो आहोत. जवळपास १० लाख प्रौढ किंवा मध्यमवयीन माणसांमागे एखादा १६ वर्षांखालील मुलगा किंवा मुलगी ही चाईल्ड प्राॅडिजी किंवा बाल चमत्कार मानला जातो.
मुंबईच्या १२ वर्षांच्या कु. आदिती भालचंद्र पुजारे हिने ‘ब्रि बुकस् ‘ या ॲमेझाॅन पुरस्कृत मुलांसाठी उपलब्ध असणार्या सृजन लेखन मंचावर ‘इन द टाॅक्झीक वर्ल्ड’ या लघू कादंबरीला लिहून तिच्यातील लेखन चमत्कार प्रदर्शित केला आहे.
आदितीचे काका आजोबा हे स्वतः एक समाजाभिमुख व समाजशील शिक्षक होते, आजोबा मुंबईतील ‘बेस्ट’ च्या माध्यमातून समाजासाठी धकाधकी व गर्दीच्या सेवेत घाम गाळलेले मराठी कण्याचे द्योतक होते आणि आजी एक सक्षम जाणीवेचा पोत स्वतःच्या मनात बाळगणारी व पुस्तकी शिक्षणाशिवायही कार्यरत जीवनाचे मर्म राखत जगलेली स्त्री आहे.
आदितिची आई सौ.काश्मिरा ही डाॅक्टर तर वडिल श्री.भालचंद्र पुजारे हे मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पळसंब गांवचे. आजही त्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि पळसंब गांवात नियमीत येणे जाणे आहे. त्यांनाही समयोचित् लेखनाची आवड आहे परंतु आदितीने ‘ब्रि बुकस् ‘ वर ज्या विषयाला हाताळत लेखन केले आहे त्या विषयासाठी केवळ पालक,शिक्षक किंवा वाचनाने सक्षमता येणे अवघड आहे. आदितीने तिच्या लघु कादंबरीमध्ये तिने जगातील,समाजातील,आसपासच्या,कुटुंबातील, कामावरील सहकार्यांमधील कलुषीत,विखारी आणि विषारी मनोवृत्तीच्या माणसांच्या जगात वावरणार्या एका कोरीअन मुलीचा म्हणजे ‘जेनीचा’ जीवनप्रवास लिहिलेला आहे.
कलुषीत व विषारी वृत्तींचा विचार मनातून काढून टाकून स्वतःवर प्रेम करायचे सहज तंत्र एखादी १२ वर्षांची विद्यार्थीनी किंवा मुलगी तिच्या लेखनाद्वारे जगासमोर मांडते आहे हीच ती चाईल्ड प्राॅडिजी…आदिती पुजारेची प्रतिभेची प्रचिती.
महाराष्ट्र राज्यातील एक मालवणी रक्ताची सजग बाल लेखिका तयार होतेय आणि महत्वाचे म्हणजे तिची सृजनशीलता ही केवळ सौंदर्य नाही तर सामाजिक, वैयक्तिक औदार्यावर भाष्य करते आहे हेच विलक्षण आहे. आज विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी लेखन हे सुद्धा एक ‘करीअर ऑप्शन’ आहे याचीही एक सजीव ओळख आदिती आहे.
कु.आदिती भालचंद्र पुजारे हिचे ‘ब्रि बुकस् ‘ या ॲमॅझाॅनच्या मंचावर उपलब्ध आहे.
तिच्या शिक्षण, ग्लोबल लेखन आणि सर्व क्रियाशिलतासाठी तिला अख्खा महाराष्ट्र शुभेच्छा देईल…देतच राहील.