बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या मडुरा सातोसेमार्गे सातार्डा रस्त्यांचे अत्यंत निकृष्ट काम आज मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी रोखले. या कामाबद्दल संबंधित ठेकेदाराला त्यांनी जाब विचारला. डांबराशिवाय टाकलेली खडी विस्कटून त्यांनी निकृष्ट काम निदर्शनास आणून दिले. काल २७ जानेवारीला हा प्रकार घडला.
मडुरा सातार्डा मार्गाची खड्ड्यांमुळे पुरती दुरवस्था झाली आहे. गेली कित्येक वर्षांपासून सदर रस्ता डांबरीकरणाची मागणी करण्यात येत होती. अखेर मडुरा रेडकरवाडी स्टॉप ते रेखवाडी दरम्यानच्या मार्गासाठी निधी मंजूर झाला आहे. याकामाला काल पासून ठेकेदाराकडून सुरुवात करण्यात आली होती.
संबंधित ठेकेदार डांबराचा वापर न करता खडी टाकून काम करण्याचा प्रयत्न करीत होता व तीच मोठी गडबडी उपसरपंच गावडे यांच्या तत्काळ लक्षात आली. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा सुपरवायझरही नव्हता. याचा फायदा घेत ठेकेदार निकृष्ट काम करुन घेण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, रेखवाडीतील युवकांनी निकृष्ट कामाची माहिती उपसरपंच बाळू गावडे यांना दिली.
उपसरपंच गावडे यांनी तातडीने निकृष्ट काम थांबविण्याचे आदेश दिले. जोपर्यंत ठेकेदार उत्कृष्ट कामाची हमी देत नाही तोपर्यंत काम न करु देण्याचा इशारा दिला. ठेकेदाराला बाळू गावडे यांनी खडे बोल सुनावले. मुळात २० वर्षांनंतर रस्त्याचे काम होत आहे. कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट काम खपवून न घेण्याची तंबी दिली. यावेळी श्री देवी माऊली कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष केशव परब उपस्थित होते.