विवेक परब | ब्यूरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजगांव वाचनालयात नुकताच ‘सत्व साहित्य प्रसिद्ध’ आजगांव साहित्य कट्ट्याचा २७ वा मासिक उपक्रम एका वेगळ्याच विषयावर तथा संकल्पनेवर रमला. संकल्पना होती ‘दिवंगत साहित्यिकांस अनावृत्त पत्र..!’
सुप्रसिद्ध साहित्यिक विनय सौदागर यांनी त्यांच्या पत्रात साहित्यिक चंद्रकांत खोत यांना लिहीलेल्या पत्रात भावना व्यक्त करताना म्हणले, “चंद्रकांतजी, बिंब-प्रतिबिंब या एका पुस्तकासाठी मी तुमचा आजन्म ऋणी राहीन. तुमचे हजार दोष विसरून जाईन. पण त्याबरोबर हेही सांगतो की, तुम्ही ‘अबकडइ’ दिवाळी अंक बंद करायला नको होता. फार नुकसान झालं आमचं. तुमची बिनधास्त, उभयान्वयी अव्यय, विषयांतर ही उत्सुकतेने वाचलेली पुस्तके वेगळी वाटली होती, पण आवडली नव्हती. अबकडइ मात्र मी अजून शोधतोय.त्याकाळी पुनर्जन्मावर तुम्ही विशेषांक काढलेला, आता तुम्हीच पुनर्जन्म घ्या अन् अबकडइ दिवाळी अंक सुरू करा.”
आजगांव वाचनालयात आयोजित या कार्यक्रमाचा विषय होता, ‘दिवंगत साहित्यिकांस अनावृत्त पत्र’. ‘पत्रास कारण की’ या साहित्य कट्ट्याच्या कार्यक्रमात एकूण पाच पत्रं वाचली गेली. प्रास्ताविकानंतर प्रथम महेंद्र प्रभू यानी साने गुरुजींना लिहिलेल्या पत्राचे वाचन झाले. त्यात त्यानी ‘पाय मळू नये म्हणून जसा जपतो,तसा मन मळू नये म्हणून जप.’ या ‘श्यामची आई’ पुस्तकातोल संस्कारक्षम गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला. नंतर सोमा गावडे यांनी स्वा. सावरकर यांना लिहिलेल्या पत्राचे वाचन केले. जातीयता निर्मुलन, पतितपावन मंदिर आणि शुद्ध मराठी यासाठी सावरकरांनी केलेल्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. नंतर ज्येष्ठ पत्रकार अनिल निखार्गे यानी जयवंत दळवी याना लिहिलेल्या पत्राचे वाचन केले. त्यांनी दळवींचे मत्स्यप्रेम, सूक्ष्म निरीक्षण, शेवटचे आजारपण आणि शिरोडा-आरवली विषयी प्रेम याविषयी ह्रदगत पत्रातून व्यक्त केले.
ग्रेस या अनाकलनीय कवीला पत्र लिहिले होते कवी सुधाकर ठाकूर यांनी. ‘वार्याने हलते रान’,’ती गेली तेव्हा’ अशा अनेक कवितांचा उल्लेख करीत त्यानी काव्यमय भाषेत सुरेख पत्र लिहिले होते. हे पत्र वाचन एका दीर्घ कवितेचा आनंद देऊन गेले. शेवटी सौदागर यानी चंद्रकांत खोत याना लिहिलेल्या पत्राचे वाचन केले.
यानंतर झालेल्या चर्चेत प्रा. जयंत पाटील, सचीन दळवी, डाॅ. मधुकर घारपुरे, आत्माराम बागलकर,विनायक उमर्ये यांनी भाग घेतला. कार्यक्रमास संजय मावळंकर,सरोज रेडकर, प्रकाश वराडकर, सिंधु दिक्षित, अनिता सौदागर, प्रिया आजगांवकर, मृणाल ठाकूर, शुभंकर ठाकूर, मीरा ठाकूर, मीरा आपटे, ईश्वर थडके आणि रश्मी आजगांवकर असे साहित्यप्रेमी उपस्थित होते.